जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ | माजी मंत्री एकनाथ खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वाद संपूर्ण जिल्ह्याला माहित आहेत. गत विधानसभा निवडणुकीत खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेलवलकर यांना पराभूत केल्यानंतर खडसे व चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. आता भाजप-शिवसेना (शिंदे गट) एकत्र आल्यानंतर आमदार पाटील यांची ताकद वाढली आहे. दरम्यान, येणार्या जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीची रंगित तालिम मानल्या जाणार्या बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
बोदवड बाजार समिती निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या शेतकरी परिवर्तन पॅनलचा प्रचार कुर्हा येथून सुरू झाला. यावेळी आमदार पाटील यांनी खडसेंवर जोरदार टीका केली. शेतकर्यांची हक्काची जागा असलेल्या बाजार समितीत शेतकर्यांना निवारा नाही. बाजार मालाला हमी भाव नाही. बोदवड समितीचे मागील दहा वर्षांचे ऑडिट केले, त्यात समिती तोट्यात असल्याचा आरोप करत, खडसे यांनी कन्येला जि.प. गटातून निवडणूक लढण्यास सांगावे, यात आपला कार्यकर्ता हरला तर आपण निवडणूक लढणार नाही, असे आव्हानही पाटील यांनी आमदार एकनाथ खडसे यांना दिले.
यास खडसे यांनीही प्रतिउत्तर दिले आहे. जि. प. व विधानसभा निवडणुका तर दूर आहे. घोडा मैदान दूर नाही. आधी बाजार समितीत तर निवडून येऊन दाखवा. आपल्या विरोधात बोलल्याने लोक मोठी होतात. तोपर्यंत त्यांना कोणी ओळखत नाही. त्यामुळे अशा लोकांना मी जास्त महत्त्व देत नाही. चार सोसायट्यांची निवडणूक झाली. त्यातील ५२ पैकी एकही विजयी उमेदवार इतर पक्षाचा निवडून आला नाही. यावरून निकाल कोणाच्या बाजूने लागेल ते स्पष्ट आहे, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.