जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२३ । पीक विम्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर आरोप केले होते. आता हे आरोप फेटाळून लावत आ.चंद्रकात पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
आ. खडसे वैफल्यग्रस्त असून त्यांना चंद्रकांत पाटील नावाचा ‘फोबिया’ झालेला आहे. मुक्ताईनगरच्या रूग्णालयात मानसोपचाराची व्यवस्था करणार असून तिथेच अशा लोकांना उपचार मिळतील अशा शब्दांत टीकास्त्र सोडत आ. चंद्रकांत पाटील यांनी खडसेंनी केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिले आहे. स्टिंग ऑपरेशन केले, हा माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आला आहे. विमा एजंटाकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होत असल्यामुळे शेतकऱ्यांनीच हे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यात माझी कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती, असंही आ पाटील म्हणाले.
खडसे नेमकं काय म्हणाले होते?
केळी पीकविम्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्टींग ऑपरेशन केले, शासनस्तरावर प्रधान सचिव कृषी विभाग यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी पीकविमा रक्कम रखडली असल्याचा आरोप केला होता.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
यावर बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, कीसुरवातीला चार हेक्टरवर शेती असल्यास त्या शेतकऱ्यांचा विमा नामंजूर होत होता. परंतु चार हेक्टरवरील जमीनधारक शेतकऱ्यांना अपात्र करू नका, अशी मागणी मी केली होती.२०२१ मध्ये कृषी विमा कंपनी ही बजाज अलायन्स होती. चार हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना विम्यापासून अपात्र करू नका, अशी मागणी केली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही विम्याचा लाभ झाला. त्यानंतर २०२२ -२३ मध्ये सरकारची विमा कंपनी आली. या काळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विम्याची नोंदणी केली.
१४ जून २०२१ ला तत्कालीन तहसीलदार श्वेता संचेती असताना कर्की येथे काही शेतकऱ्यांवर विमा कंपनीचे दोन-तीन एजंट आले आणि त्यांनी तुमच्याकडे केळी पीक नसतानाही २५ हजार घेऊन पीक विमा काढून देतो, असे सांगितले. त्यावेळेस करके येथील बाळू महाजन या शेतकऱ्यांनी तसेच काही इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना हकिगत सांगून त्या एजंटला पैसे घेताना रंगेहात पकडले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली होती.
त्यानंतर मी त्या ठिकाणी पोहोचलो. त्यामुळे स्टिंग ऑपरेशन केले, हा माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आला आहे. विमा एजंटाकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होत असल्यामुळे शेतकऱ्यांनीच हे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यात माझी कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती. केवळ लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्या ठिकाणी हजर होतो. त्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विमा रक्कम मिळाली. विमा काढल्यानंतर कंपनीद्वारा जिओ टॅगिंग करण्यात आले होते. परंतु ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी होती, असंही ते म्हणाले.