जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२२ । राज्यात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध शिवसेना हा खेळ अद्याप संपलेला नसून तो आणखी लांबत चालला आहे. राज्यातील काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या असून त्याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. राज्यातील निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. आणि हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत, असे ना.पाटील म्हणाले.
शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद अद्याप न्यायालयात प्रलंबित असून त्यावर सुनावणी देखील सुरु आहे. दरम्यान, न्यायालयात वाद सुरु तर राज्यात देखील वाद सुरु आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठिकठिकाणी एकमेकांना भिडत असून शाब्दिक युद्ध रंगले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर, हिंमत असेल तर विधानसभा आणि नगरपालिका निवडणूक एकत्र घेऊन दाखवा असे आव्हानच दिले आहे. आगामी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर हे वाद असल्याचे म्हटले जात आहे.
चंद्रकांत पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग वेळ मागणार आहे. त्यानंतर निवडणुका लागतील. तोपर्यंत निवडणुका लांबणीवर पडणार हे स्वाभाविक आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 18 ऑक्टोबरला सुनावणी आहे. त्यात काय निकाल लागतो, ते कळेल. पण निवडणुका लांबतील, असं ते म्हणाले.यावेळी त्यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनाही टोला लगावला.
सध्या जसजशा निवडणूक जवळील येत आहे तसे मंत्री देखील वेगवेगळी विधाने करीत आहेत. नुकतेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदेगट स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सल्ला वजा सूचना देत, सगळं काही नीट चालू असताना असे विषय काढू नये. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. वाढलेल्या पक्षाच्या आधारे स्वबळावर निवडणुका लढण्याचाही अधिकार आहे. तसा तो भाजपलाही आहे, असे ना.पाटील म्हणाले.