⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

आईच्या दूधात आढळलं ‘मायक्रोप्लास्टिक’, धक्कादायक माहिती समोर

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । आईचं दूध बाळासाठी अमृतासमानचं असतं. आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते. तसेच, बाळाला निरोगी राहण्यासाठी आईच्या दुधातील पोषक तत्व अत्यंत फायदेशीर ठरतात. पण इटलीतील एका संशोधकांच्या पथकानं आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक (Microplastics) शोधले आहेत. यासोबतच या दुधाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.

संशोधनासाठी, रोम, इटलीमध्ये जन्म दिल्यानंतर एका 34 वर्षीय आईच्या अनेक चाचण्या घेतल्या. या महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या दुधात प्लास्टिकचे कण आढळल्याचं शास्त्रज्ञांच्या संशोधनादरम्यान निष्पन्न झालं. अशावेळी संशोधकही चिंतेत पडले आहेत. तसेच, अशा परिस्थितीत स्तनपान करणं योग्य की, अयोग्य यांसारखे अनेक प्रश्न संशोधकांना पडले आहेत. 

पॉलिमर्स जर्नलमध्ये (Polymers Journal) प्रकाशित झालेल्या स्तन आणि दुधाच्या संशोधनात पॉलीथिलीन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीनपासून बनविलेले मायक्रोप्लास्टिक्स आढळले, जे सर्व पॅकेजिंगमध्ये आढळतात.

द गार्डियनच्या (The Guardian) अहवालात म्हटलं आहे की, “मागील संशोधनात मानवी पेशी, प्रयोगशाळेतील प्राणी आणि सागरी वन्यजीवांवर मायक्रोप्लास्टिक्सचे विषारी परिणाम दिसून आले आहेत. परंतु, मानवांवर होणारा परिणाम अद्याप अज्ञात आहे. प्लॅस्टिकमध्ये अनेकदा phthalates सारखी हानिकारक रसायनं असतात, जी आता आईच्या दुधात आढळून आली आहेत. त्यामुळे ही बाब गंभीर असून अत्यंत चिंताजनक आहे.”

2020 मध्ये इटलीमधील टीमनं मानवी प्लेसेंटामध्ये मायक्रोप्लास्टिक्स शोधलं. “ईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक्सच्या उपस्थितीचे पुरावे अर्भकांच्या असुरक्षितेबाबत मोठी चिंता वाढवतात”, असं इटलीतील अँकोना येथील युनिव्हर्सिटी पॉलिटेक्निका डेले मार्चे येथील डॉ. व्हॅलेंटीना नोटरस्टेफानो यांनी सांगितलं आहे.