जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींनी शिक्षण, क्रीडा, कला तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून नाव उज्ज्वल केले आहे. अशा गुणवंत पाल्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यास एक प्रेरणादायी पुस्तक भेट दिले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पोलीस अधीक्षकांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कुटुंबीयांचा आणि विशेषतः मुलांचा त्याग मोठा असतो. या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर यश मिळविले आहे. त्यांच्या यशाचा गौरव करणे ही पोलीस दलाची जबाबदारी आहे. प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करेल.”

या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात वाचन संस्कृती रुजविणे आणि भविष्यात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. अशा सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास होईल आणि इतर मुलांनाही उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल.











