जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच १७,७४२ पदांची मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, नवीन बसेस खरेदी करण्यात येत असून दरवर्षी ५ हजार नवीन बस खरेदी करण्यात येणार आहे. या नवीन बससेवेसाठी भरपूर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी १७ हजार ७४२ चालक व वाहक पदांच्या भरतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

कुणाला संधी मिळणार?
परिवहन विभागाची ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. यामध्ये २०२२ मध्ये झालेल्या संपादरम्यान एसटी सुरु ठेवण्यासाठी ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केले त्यांना या भरतीत प्रधान्य दिले जाणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतदेखील सामावून घेतले जाऊ शकते.












