जळगाव लाईव्ह न्यूज । सण-उत्सवांच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात तब्बल प्रतिकिलो १७ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे जळगावात साखरेचे दर आता ५५ ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सणासुदीपूर्वीच ग्राहकांच्या ताटातील गोडवा महागला आहे.

एकीकडे खाद्यतेलाचे दरही गगनाला भिडले असताना आता साखरेचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडणार आहे.

गेल्या महिन्यात साखरेचे दर सुमारे ४२ ते ४३ रुपये किलो होते. मात्र, अवघ्या महिनाभरात दरात मोठी वाढ होऊन साखर आता ५५ ते ६० रुपये किलोवर पोहोचली आहे. गत दहा वर्षांच्या काळात एका महिन्यात झालेली ही सर्वाधिक दरवाढ असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
श्रावण महिन्यापासून राज्यात सण-उत्सवांना सुरुवात होते. या काळात साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. श्रावणापासून वाढलेली मागणी दिवाळीपर्यंत कायम राहते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून साखरेचा साठा केला जातो. वाढती मागणी आणि बाजारातील अन्य घटकांमुळे साखरेच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. एका कुटुंबात महिन्याला सरासरी ५ किलो साखरेचा वापर होत असल्यास, पूर्वीच्या तुलनेत आता किमान ७५ रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत.







