कोंबडी खाद्याच्या गोण्यांमध्ये रेशनचा माल; पारोळ्यात काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश

ऑगस्ट 19, 2026 2:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा शहरातून काळ्या बाजाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंबड्यांच्या खाद्याचा छाप असलेल्या गोण्यांमध्ये शासकीय रेशनचा गहू आणि तांदूळ लपवून काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आला असून पारोळा पोलिसांनी कारवाई करत ७३.५४ क्विंटल धान्य आणि मालवाहू ट्रक असा एकूण ७ लाख १२ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

crime ra

या प्रकरणी धान्याचा मालक सुभाष विठ्ठल वाणी (६१, रा. पारोळा) आणि फरार ट्रक चालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात होणारी तस्करी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पारोळा शहरातील सप्तर्षी मंगल कार्यालयासमोर आणि भाग्यश्री टोल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता टाटा कंपनीचा केशरी रंगाचा मालवाहू ट्रक (एमएच १६ एई ६८६६) आढळून आला.

पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये कोंबड्यांच्या खाद्याचे लेबल असलेल्या गोण्यांमध्ये गहू आणि तांदूळ भरलेला आढळून आला. ट्रकमध्ये १६२ गोण्या असल्याचे तपासात समोर आले. जप्त करण्यात आलेल्या धान्याची किंमत २ लाख १२ हजार ९७० रुपये, तर ट्रकची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे.

प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

संशयितांनी कोणताही वैध परवाना नसताना प्रशासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने कोंबड्यांच्या खाद्याचे लेबल असलेल्या गोण्यांचा वापर केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सुभाष वाणी आणि ट्रक चालकाने संगनमत करून रेशनचा हा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पारोळा पोलीस शिपाई भूषण राजाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईनंतर दोन्ही संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत. रेशनचा हा माल नेमका कुठून आणण्यात आला आणि तो कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता, याचा तपासही पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now