जळगाव लाईव्ह न्यूज । अर्ध्याहून मार्च महिना संपला असून काही दिवसानंतर नवीन आर्थिक वर्ष एप्रिल महिन्याला सुरुवात होणार आहे. आणि या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा झटका बसणार आहे. एप्रिल महिन्यापासून अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता असून यामुळे ग्राहकांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

जागतिक स्तरावर वाढलेला तणाव आणि मालवाहतुकीचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. प्लास्टिक, रेझिन आणि पॉलिमर यांसारख्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने कंपन्यांनी आता उत्पादनांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रावर स्पष्टपणे दिसणार आहे. एप्रिलपासून या वस्तूंच्या किंमती ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाहन खरेदी करणाऱ्यांसाठीही धक्का बसणार आहे. काही प्रमुख कंपन्यांनी आधीच दरवाढ जाहीर केली असून १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत. इतर वाहन उत्पादक कंपन्याही २ ते ३ टक्क्यांनी किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, घरगुती वापराच्या वस्तूंमध्येही वाढ होणार आहे. टीव्ही, फ्रिज, एअर कंडिशनर यांसारख्या उपकरणांच्या किंमती ५ ते ६ टक्क्यांनी वाढू शकतात, तर शूज आणि सिंथेटिक कपड्यांच्या दरात ९ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
रुपयाच्या घसरणीमुळे आयात मालही महाग झाला असून, त्यामुळे बाजारातील महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकूणच, एप्रिलपासून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार असल्याचे चित्र आहे.












