जळगाव लाईव्ह न्यूज । दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पारा ८ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यंदा कडाक्याच्या थंडीऐवजी उबदार हिवाळा जाणवण्याची शक्यता आहे. कारण जागतिक पातळीवर ‘एल निनो’चा प्रभाव आगामी काही महिने कायम राहणार असल्याने, हिवाळ्याच्या दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

यंदाचा पावसाळा जळगावकरांसाठी लहरी ठरला. काही काळ पावसाने दडी मारली, तर काही ठिकाणी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आता पावसाळ्यानंतर हिवाळ्यातही हवामानाचा हा लहरीपणा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान कमी न होता अचानक ढगाळ वातावरण निर्माण होणे, वादळी पाऊस पडणे किंवा गारपीट होण्याचे प्रकार वाढू शकतात.

हवामानातील या बदलांचा थेट फटका जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला बसणार आहे. कडाक्याची थंडी ही गहू आणि हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी पोषक मानली जाते. मात्र, तापमान चढे राहिल्यास या पिकांची उत्पादकता घटण्याची भीती आहे. तसेच, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या दादर ज्वारीचे नुकसान होऊ शकते. जळगावची ओळख असलेल्या केळी पिकावर करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे.
शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
हवामान अभ्यासक यांच्या मते, दिवसाचे वाढलेले तापमान आणि समुद्रावरील बाष्प एकत्र आल्याने नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, मेघगर्जना आणि अवकाळी पावसाची शक्यता दाट आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाचा अंदाज घेऊनच खत व सिंचनाचे नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे.






