जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२४ । गेल्या तीन चार दिवसापासून जळगावसह राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, सततच्या पावसामुळे खरिपाचे पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यातच हवामान खात्याने आजही राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, असा इशारा दिला आहे.
राज्यात आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?
मुंबई, पुणे ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी, कोकणातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या चक्रीवादळाने बेफाम पाऊस झाल्यामुळे राज्यातील कोरडी धरणं जिवंत झाली असून विहीरी देखील काठोकाठ भरल्या आहेत. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे.
तर काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने जमिनी खरडून गेल्या असून पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहेत. दरम्यान, आता पुढील 12 तासांत पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन दूर झालंय.