मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

अत्यंत महत्वाची बातमी! 1 ऑगस्टपासून होणार तुमच्या खिशावर परिणाम करणारे अनेक बदल

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२३ । जुलै महिना संपायला अवघे चार दिवस उरले असून त्यांनतर ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल. दरम्यान, दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. यावेळी देखील १ ऑगस्ट पासून अनेक बदल होणार असून यातील काही बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. नेमके काय बदल होणार आहे ते जाणून घेऊया या..

गॅस सिलेंडर भाव
मे आणि जून महिन्यात घरगुती गॅस सिलेंडर धारकांना कसलाच दिसाला मिळाला नाही. 1 जुलै रोजी 14 किलोच्या गॅसच्या दरात कपात झाली नाही. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची कपात झाली होती. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक गॅसधारकांना मोठा दिलासा मिळाला होता. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात झाली होती. ही कपात पुढील महिन्यात पण सुरु होती.

आयटीआर फाईलसाठी दंड
आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. 31 जुलैपर्यंत करदात्यांना त्यांचा आयटीआर जमा करावा लागणार आहे. आयटीआर फाईल नाही केला तर 1 ऑगस्टपासून दंड द्यावा लागेल. आयटीआर उशीरा फाईल केल्याबद्दल करदात्याला 5 हजार रुपयांपर्यंतचा दंड द्यावा लागेल.

बँकांना 14 दिवस सुट्या
ऑगस्ट महिन्यात बँका एकूण 14 दिवस बंद राहतील. पुढील महिन्यात सुट्यांचा पाऊस पडणार आहे. केवळ इतक्या दिवसच बँका सुरु राहतील. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनामुळे संपूर्ण देशभर या दिवशी बँका बंद असतील. याशिवाय, रक्षा बंधन, ओणम आणि इतर सणांमुळे देशातील अनेक भागातील बँकांना सुट्या असतील. त्यामुळे बँकेचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या.

या नियमानुसार दंड
31 जुलैनंतर आयटीआर फाईल केल्यास दंडाची तरतूद आहे. आयकर विभागाचा अधिनियम 1961 चे कलम 234F अंतर्गत 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना 1000 रुपयांचा दंड द्यावा लागेल.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती
जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या भावात चढउतार सुरु आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कच्चे तेल स्वस्त आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कच्चा इंधनाच्या आघाडीवर दिलासा आहे. पण देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत आली नाही. परिणामी नागरिकांमध्ये नाराजी आहे. तेल कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. लिटरमागे या कंपन्यांना 8-10 रुपयांचा फायदा होत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इंधन कपातीचा चेंडू तेल कंपन्यांकडे टोलावला.