
ग्रामीण भागातील 18 हून अधिक गावांत उपक्रम राबवून गरिबांना कपडे वितरीत
जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट, तर दुसरीकडे दिवाळीचा सण अशा स्थितीत गरजवंतांच्या घरातही आनंदाचा दीप उजळावा आणि त्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण व्हावा, या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत येथील मंगळग्रह सेवा संस्थेने अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माणुसकीची दिवाळी’ हा स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत संस्थेतर्फे तालुक्यातील ग्रामीण भागातील एक हजारांवर गरजवंतांना दिवाळी फराळ कीट वाटप केले.
तालुक्यातील अनोरे, शिरूड, तासखेडे, आमोदे, तासखेडा, गलवाडे, अमळगाव, खौशी, गंगापुरी, कन्हेरे, पातोंडा, लोण, मारवड, सात्री, कळमसरे, रत्नापिंप्री, दापोरी आणि कोळपिंप्री आदी गावांमध्ये संस्थेतर्फे विश्वस्त व सेवेकरी यांनी दिवाळई फराळाचे कीट वाटप केले. तसेच काही गावांतील गरजू कुटुंबांना नवीन ड्रेस, तर काही ठिकाणी वापरण्यायोग्य जुने कपडेही वितरीत केले. त्यामुळे आर्थिक परिस्थितीने बेजार झालेल्यांनाही दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यातील अडचणी दूर होऊन या कुटुंबांतील सदस्यांच्या चेहऱ्यावर सकारात्मक हास्य फुलले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा, या उद्देशाने संस्थेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची माहिती देत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप मिळावे आणि गरजूंची दिवाळीही आनंददायी व्हावी, यासाठी दानशूर व्यक्तींनी फराळ, कपडे व अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले होते.
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे तसेच मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, बाळा पवार आदींनी मंदिराच्या सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंपर्यंत पोहोचविण्यासंदर्भातील ‘माणुसकीची दिवाळी’ या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचा संदेश गावा-गावांत पोहोचला.





