अमळनेर

अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात पाच देवींचे दिव्य दर्शन; नवरात्रोत्सवात भाविकांसाठी पर्वणी!

जळगाव लाईव्ह न्यूज । शक्ती, भक्ती, श्रद्धा आणि साधनेचा पवित्र उत्सव म्हणून शारदीय नवरात्रोत्सव सर्वत्र साजरा होतो. या उत्सवाला माता दुर्गा यांच्या प्रथम स्वरूपात असलेल्या श्री शैलपुत्रींच्या पूजनाने सुरूवात होते. नवरात्रातील पहिला दिवस हा केवळ देवीच्या उपासनेचा प्रारंभ नसून जीवनात स्थिरता, धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक संकल्प रुजविण्याचा आध्यात्मिक संदेश देणारा दिवस मानला जातो. या मंगलमय पर्वाच्या निमित्ताने अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह देवांच्या मंदिरात भाविकांना मंगळग्रह देवांसोबतच मंदिर परिसरात श्री भूमीमातेसह श्री पार्वती, श्री अनघालक्ष्मी, श्री भैरवी, श्री लक्ष्मी माता यांच्या अलौकिक मूर्तींच्या दर्शनाचा योग साधता येणार आहे. एकाच मंदिरात पाच देवींच्या मूर्ती विराजमान असलेले श्री मंगळग्रह मंदिर हे बहुधा विश्वातील एकमेव असावे, असे भाविकांमध्ये बोलले जात आहे.

श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील श्री भूमीमाता, श्री पार्वती, श्री अनघालक्ष्मी, श्री भैरवी आणि श्री लक्ष्मी माता या पाच देवींच्या मूर्ती हे येथील धार्मिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्य ठरले आहे. देवींच्या विविध रूपांमधून शक्ती, करुणा, समृद्धी, भूमीशी असलेले नाते, संकटांवर मात करण्याची प्रेरणा आणि भक्तीभाव अशा जीवनमूल्यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात श्री मंगळग्रह देवांसह पाचही देवींचे दर्शन घेणे हा भाविकांसाठी श्रद्धेचा आणि आध्यात्मिक चिंतनाचा निश्चितच विशेष अनुभव ठरू शकणार आहे.

माता शैलपुत्री : स्थिरता, निसर्ग आणि दृढ संकल्पाचे प्रतीक

नवदुर्गेच्या नऊ रूपांमध्ये माता शैलपुत्री यांना प्रथम स्थान आहे. ‌‘शैल‌’ म्हणजे पर्वत आणि ‌‘पुत्री‌’ म्हणजे कन्या. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून त्यांना ‌‘शैलपुत्री‌’ असे संबोधले जाते. पौराणिक कथेनुसार पूर्वजन्मात त्या राजा दक्षाची कन्या सती होत्या. दक्षाच्या यज्ञप्रसंगी त्यांनी देहत्याग केला आणि पुढील जन्मात हिमालयाच्या पोटी कन्या म्हणून जन्म घेतला. पुढे त्याच देवींचे स्वरूप माता पार्वती म्हणून ओळखले जाते. माता शैलपुत्री यांच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ असते, तर त्यांचे वाहन नंदी आहे. त्रिशूल हे सामर्थ्य आणि अधर्माविरुद्ध उभे राहण्याचे प्रतीक मानले जाते. कमळ निर्मळता आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देते, तर नंदी निष्ठा, संयम आणि समर्पणाची आठवण करून देतो.

पर्वताप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर राहणे, संकटांमध्ये विचलित न होता ध्येयाकडे वाटचाल करणे आणि मनामध्ये श्रद्धेचा दीप प्रज्वलित ठेवणे, असा माता शैलपुत्रींच्या उपासनेचा आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवींचे पूजन करताना केवळ धार्मिक विधी नव्हे, तर मनाची स्थिरता आणि जीवनातील चांगल्या संकल्पांची जपणूक करण्याचाही संदेश यातून मिळतो.

श्री मंगळग्रह देव आणि देवीशक्तीचा आध्यात्मिक संगम

भारतीय ज्योतिषपरंपरेनुसार श्री मंगळग्रह देवांना ऊर्जा, साहस, पराक्रम, भूमी आणि कार्यक्षमता यांच्याशी जोडले जाते. श्री मंगळग्रह देवांच्या उपासनेतून धैर्य, आत्मविश्वास आणि अडचणींना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दुसरीकडे माता शैलपुत्रींचे स्वरूप स्थिरता, निसर्गाशी नाते आणि दृढ संकल्प यांचे प्रतीक मानले जाते. स्थिरता आणि पराक्रम, श्रद्धा आणि कर्म, संयम आणि सामर्थ्य यांचा हा समन्वय नवरात्रोत्सवाच्या आध्यात्मिक चिंतनाला अधिक अर्थपूर्ण बनवतो. श्री मंगळग्रह देवांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देवींच्या विविध रूपांचे दर्शन एकाच परिसरात घेता येत असल्याने या मंदिराला नवरात्रोत्सव काळात विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते.

एकाच मंदिर परिसरात पाच देवींच्या स्वतंत्र मूर्ती

श्री मंगळग्रह मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पाच देवींच्या स्वतंत्र मूर्ती विराजमान आहेत. प्रत्येक मूर्तीची रचना, आराध्य देवता आणि धार्मिक संदर्भ वेगळा आहे.

  1. माता पार्वती : शिवपरिवाराच्या सान्निध्यात माता पार्वतींचे दर्शन
    माता पार्वती या भगवान शिव यांच्या अर्धांगिनी आणि शक्तीतत्त्वाचे प्रतीक मानल्या जातात. शिवपरिवारासोबत विराजमान असलेल्या माता पार्वती यांच्या दर्शनातून कौटुंबिक ऐक्य, प्रेम, समर्पण आणि संतुलित जीवनाचा संदेश अनुभवता येतो. माता शैलपुत्री आणि माता पार्वती यांच्या स्वरूपांमधील आध्यात्मिक नाते नवरात्राच्या पहिल्या दिवसासंदर्भात विशेष महत्त्वाचे ठरते.
  2. भूमीमाता : धरणीमातेप्रती कृतज्ञतेची भावना
    भारतातील दाक्षिणात्य शैलीतील मूर्ती हे भूमीमातेचे विशेष आकर्षण आहे. भूमी ही सर्व सजीवांना आधार देणारी माता आहे. अन्न, निवारा, निसर्ग आणि जीवनाचा आधार म्हणून पृथ्वीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भूमीमातेच्या दर्शनातून निसर्गाप्रती कृतज्ञता, पर्यावरण संवर्धन आणि भूमीचा आदर करण्याची प्रेरणा मिळते.
  3. माता अनघालक्ष्मी : गुरुतत्त्व आणि समृद्धीचा संदेश
    कमंडलू आकाराच्या मंदिरात भगवान श्री गुरुदत्तात्रयांसोबत विराजमान असलेल्या माता अनघालक्ष्मी या येथील वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक आकर्षण आहेत. दत्तात्रय परंपरेत गुरुतत्त्वाला विशेष महत्त्व आहे. ज्ञान, साधना, वैराग्य आणि आत्मचिंतन यांचा संदेश गुरुतत्त्वातून मिळतो, तर लक्ष्मीतत्त्व समृद्धी आणि कल्याणाशी जोडले जाते. या दोन्ही आध्यात्मिक संकल्पनांचा संगम भाविकांना अंतर्मुख करणारा ठरतो.
  4. माता भैरवी : शक्ती, निर्भयता आणि संरक्षणाचे प्रतीक
    त्रिशुलात्मक आकाराच्या या मंदिरात भगवान श्री कालभैरवांसोबत विराजमान असलेल्या माता भैरवी भाविकांचे लक्ष वेधून घेतात. देवींचे भैरवी स्वरूप सामर्थ्य, निर्भयता आणि नकारात्मक प्रवृत्तींवर मात करण्याच्या संकल्पनेशी जोडले जाते. त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक असून, कालभैरव उपासनेला शैवपरंपरेत विशेष स्थान आहे. या मंदिरातील दर्शनातून संकटांचा सामना करण्याची मानसिक ताकद आणि धर्मनिष्ठेची प्रेरणा मिळते, अशी भाविकांची भावना आहे.
  5. माता लक्ष्मी : समृद्धी, सौभाग्य आणि संतुलित जीवनाची प्रेरणा
    तुळसाई गार्डनमध्ये भगवान विष्णू आणि शेषनागासोबत विराजमान असलेल्या माता लक्ष्मी हे मंदिर परिसरातील आणखी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. भगवान विष्णू हे पालनकर्ते, तर माता लक्ष्मी या समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवता म्हणून पूजल्या जातात. शेषनागाच्या सान्निध्यातील हे स्वरूप सृष्टीचे संतुलन, पालनपोषण आणि समृद्धी यांची आठवण करून देते. तुळशीशी जोडलेली भक्तिपरंपरा आणि निसर्गरम्य परिसर भाविकांच्या दर्शनानुभवात प्रसन्नतेची भर घालतात.

श्री मंगळग्रह मंदिरातील पाच देवींच्या स्वतंत्र मूूर्ती या आध्यात्मिक अनुभवाला वेगवेगळे आयाम देतात. माता पार्वती यांच्यात मातृत्व आणि कौटुंबिक समरसता, भूमीत निसर्गाविषयी कृतज्ञता, अनघालक्ष्मीत गुरुतत्त्व आणि कल्याण, भैरवीत निर्भयता, तर माता लक्ष्मी यांच्यात समृद्धी आणि संतुलनाचा भाव अनुभवता येतो. त्यामुळे या दर्शनाकडे केवळ देवदर्शन म्हणून नव्हे, तर भारतीय धार्मिक परंपरेतील विविध शक्तिसंकल्पनांचा परिचय करून देणारा अनुभव म्हणूनही पाहता येतो.

कुटुंबासह दर्शनासाठी अमळनेरला भेट देण्याचे आवाहन
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री मंगळग्रह देव आणि पाचही देवींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी कुटुंबासह अमळनेर येथील चोपडा रोडवरील श्री मंगळग्रह मंदिराला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे. एकाच परिसरात विविध देवीस्वरूपांच्या मूर्ती, त्यांची वेगवेगळी रचना आणि धार्मिक संदर्भ यामुळे भाविकांना एकाच भेटीत समृद्ध आध्यात्मिकतेची अनुभूती घेता येते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button