
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाचोरा तालुक्यातून मोठी घडामोड समोर आली आहे. आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा छाननीदरम्यान बाद झालेला उमेदवारी अर्ज अपिलानंतर वैध ठरला असल्याचं सांगितले जात आहे. नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या अपिलात सुमित पाटील यांना दिलासा मिळाल्याने आता त्यांना जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान सुमित पाटील यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत भाजपचे उमेदवार सतीश शिंदे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला होता. परिणामी, सतीश शिंदे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, सुमित पाटील यांनी या निर्णयाविरोधात नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर सुनावणी झाल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे छाननीदरम्यान बाद झालेल्या अर्जाला अपिलात मान्यता मिळाल्याने निवडणुकीचे चित्र बदलले आहे.
सतीश शिंदे विरुद्ध सुमित पाटील लढतीची शक्यता
सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाल्यानंतर सतीश शिंदे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सुमित पाटील यांचा अर्ज वैध ठरल्याने या मतदारसंघातील स्पर्धा पुन्हा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील स्थानिक राजकीय संघर्षाला सहकार निवडणुकीच्या माध्यमातून नवे स्वरूप मिळू शकते. आता उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रियेत काय घडते आणि सतीश शिंदे विरुद्ध सुमित पाटील अशी प्रत्यक्ष लढत होते का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





