
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी सणाच्या पहिल्या दिवसाचा मान असलेल्या वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीचा उत्सव अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात गोमाता आणि वासराचे पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले आणि त्यांच्या पत्नी सौ. आशाताई महाले यांच्या हस्ते गोमाता व गोवत्साचे पूजन करण्यात आले. यावेळी धार्मिक विधी पार पाडत गोमातेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांच्यासह मंदिराचे पुरोहित आणि सेवेकरी उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त सेवेकऱ्यांना फराळ वाटप
दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने मंदिरातील सेवेकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. डॉ. डिगंबर महाले आणि समस्त विश्वस्त मंडळाच्या हस्ते सेवेकऱ्यांना दिवाळीचा फराळ देण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सेवेकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.धार्मिक परंपरेचे जतन करण्यासोबतच सेवेकऱ्यांप्रती आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.





