जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । प्रत्येक पक्षात काही नारद असतात, त्या-त्या पक्षांनी अशा नारदांना सांभाळले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे म्हणत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्यक्ष नाव न घेता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse ) यांच्यावर निशाणा साधलाय. गुलाबराव पाटील हे रविवारी जळगावात आले असता यादरम्यान अजिंठा विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना स्वबळावर लढेल किंवा महाविकास आघाडी म्हणून लढेल. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढण्याचा प्रयत्न करतो मात्र सर्वांची मते जुळली पाहिजेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी म्हणून स्वबळावर निवडणूक लढण्याबाबतचे स्थानिक पातळीवर देण्यात आले होते.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष स्वतंत्र लढले. तरीही आगामी निवडणुकांबाबत वरिष्ठ पातळीवरूनचे आदेश येतील त्या आदेश सर्व पक्ष पाळतील अशी अपेक्षा आहे. राज्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधील चित्र बघितलं तर राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुक झाल्या. त्यात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष झाले असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.












