⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

महाराष्ट्र चार टप्प्यात होणार अनलॉक?; असा असेल ठाकरे सरकारचा प्लॅन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । राज्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना राज्य अनलॉककडे वाटचाल करत असल्याचं बोललं जात आहे. या अनुषंगाने चार टप्प्यात राज्य अनलॉक करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे.  त्यामुळं १ जूनपासून राज्यातील कठोर निर्बंध शिथील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

त्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. लॉकडाऊनमध्ये दुकानदारांना सकाळी ७ ते ११पर्यंत दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात हे निर्बंध मागे घेण्यात येऊन पूर्ण दिवस दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार व मद्यालय या सेवा सुरु करण्यात येतील. तर, चौथ्या टप्प्यात करोना परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार मुंबई लोकल व धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसंच, ज्या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहेत तिथं रुग्णसंख्या पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे.