जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी धोका अद्याप टळलेला नाही. तिसऱ्या लाटेचे आमंत्रक आपण होऊ नका. सर्वांच्या अडचणी आपल्याला कळता आहेत परंतु आणखी १५ दिवस निर्बंध कायम ठेवणे गरजेचे आहे. दोन दिवसात जिल्ह्यानुसार आढावा घेऊन काही जिल्ह्यात निर्बंध अधिक कडक करावे लागतील तर काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना काळात धान्य वाटप केलं. ५५ लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या. फेरीवाल्यांसाठी निधी दिला. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी काम करत आहोत. काही निर्बंध लादावे लागतात. त्यापेक्षा वाईट काम नाही. जी जनता आपल्याला आपलं मानते त्यांच्यावर बंधनं लादणं यापेक्षा कटू काम कोणतंही असू शकत नाही. कोरोना लाट खाली यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असं काही लोक विचारत आहोत. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. पण आजची जी मृतसंख्या ही गेल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्याच्या बरोबरीचं आहे. गेल्यावेळीची लाट ही सणासुदीनंतर आली होती. अजूनही आपण म्हणावं तेवढे खाली आलोलो नाही. रुग्णसंख्या कमी होत आली असली तरी गेल्यावेळीची सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीची संख्या आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हल्कीशी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण आपल्याला थांबवायला हवं.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
– लॉकडाऊन असला तरी अर्थचक्र सुरू राहिले पाहिजे.
– तिसरी लाट लहान बालकांवर यायची शक्यता आहे.
– शिक्षण क्षेत्रात काही निर्णय केंद्राने घेणे आवश्यक आहे.
– लसीसाठी पुरवठादार कंपनीला एकरकमी चेक देण्यास तयार.
– घर, वस्ती, गाव कोरोनामुक्त करण्याचे ठरवले तर राज्य कोरोनामुक्त होऊ शकते.
– बारावीच्या परीक्षेबाबत केंद्राने धोरण ठरवायला हवे.
– शेतकऱ्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला.
– शेती निगडित वस्तूंच्या दुकानांना पूर्ण निर्बंध नसतील पण वेळेचे बंधन असेल.
– दुसरी लाट अपेक्षेपेक्षा खूप मोठी होती. अनेकांनी आपले आप्तेष्ट गमावले.
ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू ; कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार
ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.
पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :
वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
– सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.
– सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील.
– अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
– कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
– कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते
पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :
वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.
– अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
– दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.