जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिका निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचा धुरळा आजपासून उडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज रविवार, दिनांक ४ जानेवारी रोजी पिंप्राळा येथे होणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भवानी मंदिर येथे प्रचाराचे नारळ फोडून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.

पिंप्राळ्यातील भवानी मंदिरापासून महायुतीचा प्रचार सुरू केला जाणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे रविवारी दुपारी जळगावात दाखल होत आहेत. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरात त्यांची जाहीर सभा होणार आहे.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जानेवारीला व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ रोजी जळगावात येणार आहेत. प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ६ रोजी जळगावात येत आहेत. दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रोड शो होईल अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. तसेच शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ८ जानेवारीला येत आहेत. रोड शोचे नियोजन शिवसेनेचे असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली आहे.











