⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

तरुण मुलगा गमावला, मातेची शासनाकडून वर्षभरापासून फरपट

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । यावल तालुक्यातील कोळवद येथील २२ वर्षीय तरुणाचा सातारा जिल्ह्यातील वाई येथे पाटचारीत बुडून मृत्यू झाला होता. यानंतर गेल्या वर्षी यावल तहसील कार्यालयातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठवला होता. मात्र, वर्षभरापासून हा प्रस्ताव कुठे अडकला आहे? ही कोणती माहिती नसल्याने मृताची आई तहसीलच्या खेट्या घालत आहे. शुक्रवारीदेखील तहसीलदारांकडे मदत मिळवून देण्याची विनंती केली.

प्रस्ताव मंत्रालयात कोळवद येथील रहिवासी विकास रामचंद्र पाटील हा तरुण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वाई येथील कंपनीत कामाला होता. ५ जून २०१९ रोजी मोतीबाग मधील कालव्यात पडून त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तहसीलदारांनी ऑगस्ट २०२१ मध्ये या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई शाखेतून हा प्रस्ताव मंत्रालयात गेला. मात्र, वर्ष उलटूनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे मृताची आई विजयाबाई रामचंद्र पाटील तहसीलमध्ये खेट्या घालत आहे. शुक्रवारी देखील त्यांनी तहसीलदार महेश पवार यांची भेट घेतली. यानंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रमणध्वनी करून माहिती घेतली. त्यात हा प्रस्ताव मंत्रालयात असल्याचे समोर आले.