जळगावकरांनो ऐका.. तर १०० कोटींच्या निधी पैकी केवळ ४० टक्केच काम मार्गी लागणार ?
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२३ । शहरातील रस्त्यासाठी मंजुर झालेल्या शंभर कोटींच्या निधीतून ज्या भागात अमृतची पाणी पुरवठा लाईन व भूमिगत गटारींचे (मलनिस्सारण) काम पूर्ण झाले आहे. त्या भागातील ९१ रस्ते काँक्रिट करण्यासाठी मनपाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सां.बा.विभागाला देण्यात येणार आहे. त्यानुसार पीडब्ल्यूडी विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून कामाला सुरुवात होणार आहे.
शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आ. राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नाने मंजुर झाला असून या निधीतून २६७ रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. परंतु अमृत २.० योजने अंतर्गंत होणाऱ्या भूमिगत गटारींचे काम शहरातील ६० टक्के भागात बाकी आहे. त्या भागातील रस्त्यांचे काम करतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. म्हणून सध्या भूमिगत गटारी व पाणी पुरवठा लाईनचे काम ज्या ज्या भागात पूर्ण झाले आहे, त्या त्या भागातील रस्ते तयार करण्यासाठी मनपाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे शंभर कोटीतून पहिल्या टप्प्यात जलवाहिनी व मलवाहिनी पूर्ण झालेल्या भागातील ९१ रस्त्यांचे काम सुरु होणार असून उर्वरीत रस्त्यांबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, सदर रस्त्यांचे काम देखील तातडीने मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून बैठकींचा सपाटा सुरु आहे. मात्र, अजूनही त्यावर पर्यांय मनपा प्रशासनाला सापडलेला नाही.
इतर काम लवकर करण्याचे आव्हान !
अमृत २.० योजने अंतर्गंत होणाऱ्या भूमिगत गटारींचे काम शहरातील ६० टक्के भागात बाकी आहे. त्या भागातील रस्त्यांचे काम करतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. अश्यावेळी हि काम लवकरात लवकर करण्याचे आव्हान मनपा पुढे आहे.
महापालिकेने अमृत योजनेअंतर्गंत जलवाहिनी व मलवाहिनी पुर्ण झालेल्या भागातील २३ प्रस्तांवामधील कामे करता येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) दिली आहे. त्या अनुषंगाने पीडब्ल्यूडीकडून निविदा प्रकिया राबविण्यात येणार आहे. यात एकुण ९१ रस्त्यांची कामे होणार आहेत.
मनपाने सादर केला अहवाल
महापालिकेने शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून सार्वजनिक बांधकाम विभागाला अहवाल सादर केला आहे. या अहवालात कोणकोणत्या रस्त्यांवर काय काय अडचणी आहेत. त्यांची माहिती दिली आहे. कोण कोणत्या रस्त्यांवर जलवाहिनी झाली आहे, कुठे कुठे मलवाहिनी बाकी आहे, याची सविस्तर माहिती त्या अहवालात आहे.
अमृत योजनेअंतर्गंत होणाऱ्या भूमिगत गटारींचे काम अमृत १.० मध्ये ४० टक्के काम झालेले आहे. यामध्ये मेहरूण, नवीपेठ, जुने जळगाव, खेळी परिसर, शिवाजीनगर भागातील गटारींचे काम झालेले आहे. तर, ६० टक्के भागातील काम अमृत २.० मध्ये केले जाणार आहे. यात खोटेनगर, पिंप्राळा शिवार, गणेश कॉलनी, हरिविठ्ठल, महाबळ, रायसोनी नगर, वाघ नगर, निमखेडी शिवार, शिवकॉलनी, जिल्हापेठ, रामानंद नगर परिसराचा सामावेश आहे.