⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जळगाव जिल्ह्यात जि.प., पं.स.साठी महाविकास आघाडीचे नेते येणार एकत्र!

जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | जळगाव जिल्ह्यात येत्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यातच नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावेळी याबाबत त्याच्याशी बातचीत स्थानिक नेत्यांनी केली. यावेळी जिल्ह्यात महाविकास आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते उत्सुक असल्याचे समजले. (mahavikas aghadi jalgaon zp)

जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सुरुवातीपासूनच सत्ता आहे. अशावेळी यांना दूर ठेवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र येणे गरजेचे आहे. मात्र महाविकास आघाडी सत्ते बाहेर गेल्यापासून शिवसेनेतही दुफळी निर्माण झाली आहे. शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना अशा दोन शिवसेना एकमेकांसमोर उभ्या राहिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हि काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या सोबत आहे. तर शिंदे गटाची शिवसेना ही भाजपा सोबत आहे. अशावेळी शिंदे गट आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात महाविकास आघाडी व्हावी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे असे म्हटले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या कार्यकाळ संपला तेव्हा जळगाव जिल्हा परिषदेवर एकूण ६७ जागा होत्या. यामध्ये ३० भाजपाकडे, १६ राष्ट्रवादीकडे, १४ शिवसेनेकडे तर ४ या काँग्रेसकडे होत्या. त्यानंतर काँग्रेसचे दोन सदस्य भाजपाने आपल्याकडे वळवले आणि आपली सत्ता बसवली. गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.मात्र ते आता मोडून पाडण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्र येऊ शकते असे म्हटले जात आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक मजबूत पक्ष आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे चांगले संघटन आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे मातब्बर नेते आहेत. अशावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी आमदार, स्थानिक नेते यांच्याशी चर्चा केली असता. सर्वांनीच राष्ट्रवादी काँग्रेस हाच पहिला नंबर चा पक्ष व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सांगितले. मात्र ज्या प्रकारे महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला तसाच प्रयोग जळगाव जिल्ह्यातही व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे.(ravindra bhaiya patil jalgaon ncp zp )

याचबरोबर रवींद्र पाटील यांच्याशी एकनाथराव खडसे यांच्याबाबत चर्चा केली असता. रविंद्र पाटील असे म्हणाले की, एकनाथराव खडसे हे गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पक्षासोबत होते. मात्र ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार आहेत. एकनाथराव खडसे हे फार मोठे नेते असून त्यांच्या केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जनसंपर्क आहे. अशावेळी एकनाथराव खडसे आमच्या पक्षात आल्यामुळे आमच्या पक्षाला जिल्हा परिषदेमध्ये व इतर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फायदाच होणार आहे. (eknath khadse jalgaon zp)