⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | छत्रपतींच्या नावे असलेल्या उद्यानात सुरूय सर्वात मोठा पत्त्यांचा क्लब

छत्रपतींच्या नावे असलेल्या उद्यानात सुरूय सर्वात मोठा पत्त्यांचा क्लब

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । शहरातील मेहरूण तलावालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची अवस्था अनेक वर्षांपासून भकास झाली असून उद्यानाचे नूतनीकरण करण्याचा शब्द काही दिवसांपूर्वीच सत्ताधाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्याप्रमाणात सुरु असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर देखील अद्याप धंदे सुरूच आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदेवाल्यांची धूम असून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पत्त्यांचा मोठा अड्डाच सुरु आहे. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी दोनवेळा छापा टाकल्यानंतर देखील क्लब सुरु असल्याने त्याच ठिकाणी बिनधास्त अड्डा सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांना कुणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्याप्रमाणात बोकाळले असून विशेषतः सट्टा, पत्ता, अवैध दारू, अवैध गॅस भरणा करणाऱ्यांनी कळस गाठला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील मुख्य कर्मचारी कलेक्शनमध्ये व्यस्त असल्याने कारवाईसाठी कुणीही पुढाकार घेत नाही. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. राज्यात सत्ता असलेल्या पक्षाने निवेदन दिल्यानंतर देखील पोलिसांनी अद्याप कारवाईचा बडगा उचलला नाही. काही महिन्यांपूर्वी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजीत पवार यांनी अवैध धंद्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याची कानउघडणी केली होती. शहरात सट्टाचे अड्डे चौकाचौकात असले तरी पत्त्यांचे अनधिकृत क्लब मोजकेच आहेत.

पाळधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेला पत्त्यांचा मोठा क्लब बंद झाल्यानंतर जुगाऱ्यांनी आपला मोर्चा जळगाव शहराकडे वळविला आहे. निसर्गाच्या सानिध्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात लहान मुलांच्या जुन्या जलतरण तलावलगत नाल्याजवळ मोठा पत्त्यांचा क्लब सुरु आहे. गेल्या काही महिन्यात सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी दोनवेळा त्याठिकाणी कारवाई देखील केली परंतु नंतर स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाने पुन्हा क्लब जैसे थे सुरु राहिला. पोलिसांच्या कारवाईत लाखोंची रक्कम हाती लागली होती मात्र नंतर काय झाले? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. सध्या सुरु असलेल्या या पत्त्यांच्या क्लबवर जुगार खेळतांना अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत तर शहरातील दिग्गज माजी राजकारणी देखील त्याठिकाणी जुगार खेळत मजा लुटत असतात. केवळ शहरातीलच नव्हे तर इतर तालुक्यातील राजकारणी आणि जुगारी देखील त्या क्लबवर जुगार खेळण्यासाठी येतात.

दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या या क्लबवर अद्याप कारवाई का होत नाही? एमआयडीसी पोलीस, सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करताय का? असा प्रश्न परिसरातील नागरिक आणि उद्यानात क्रिकेट खेळण्यासाठी, फोटोशूट करण्यासाठी येणारे नागरिक उपस्थित करीत आहेत. क्लबजवळच जुगारी आणि इतर नागरिक मद्यपानाचा येथेच्छ आनंद लुटत बसलेले असतात. सायंकाळच्या वेळी परिसरात दुचाकी शिकण्याचा सराव करायला येणाऱ्या महिला भगिनींना त्याचा त्रास होत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या या उद्यानात सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे छत्रपतींचा देखील अवमान होत असून सामाजिक संघटना, महिला संघटनांनी याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह