राजकारणभुसावळ

भुसावळमध्ये भाजपा-शिंदे गटात ‘मिठाचा खडा’? गिरीश महाजन म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मतभेदांवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या भूमिकेवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य करत महायुतीत आल्यानंतर युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, अनिल चौधरी हे शिवसेनेत नव्याने आले आहेत. त्यांचे भुसावळबद्दलचे प्रेम सर्वांनाच माहिती आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्याप आपली आणि अनिल चौधरी यांची भेट झालेली नाही. भेट झाल्यानंतर त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

पुढे बोलताना महाजन म्हणाले की, अनिल चौधरी आता महायुतीचा भाग झाले आहेत. जुने सर्व सहकारी आता एकत्र आले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये विनाकारण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये. असा प्रयत्न होणारही नाही आणि झाला तरी त्याने काही फरक पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भुसावळमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय समीकरणे आणि स्थानिक पातळीवरील समन्वयाचा मुद्दा चर्चेत असतानाच गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता अनिल चौधरी यावर काय प्रतिक्रिया देतात आणि महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय कसा साधला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button