⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगावच्या टिनेजर्स, तरुणाईचा रोल मॉडेल ‘दुर्लभ कश्यप’

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात घडलेल्या खून, हाणामाऱ्यांच्या घटनेमुळे जिल्ह्यात अस्वस्थता निर्माण होत चालली आहे. बहुतांश गुन्हे वर्चस्वाच्या लढाईतून होत असून ‘खून का बदला खून पॅटर्न’ रूढ होत चालला आहे. खांद्यावर रुमाल, कपाळावर टिळा, डोळ्यात काजळ, शर्टाचे एक बटन उघडे, गळ्यात काळा दोरा, मोठे लॉकेट घालून फिरणारे अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुण अलीकडे पाहायला मिळत आहे. मुळात हा पॅटर्न आला कुठून हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. जळगावातील टिनेजर्स आणि तरुणाईला वेड लावलेय ते उज्जैनच्या ‘दुर्लभ कश्यप’च्या गुंडगिरी प्रवृत्तीने. लहान वयात उज्जैनचा मातब्बर गुंड बनण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या दुर्लभ कश्यपची स्टाईल आणि गुन्हेगारी पद्धतीचा अवलंब जळगावात सुरु आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, खून, हाणामाऱ्या आणि चिल्लेपिल्ले कंपनीच्या रोज नव्याने उदयास येणाऱ्या गॅंग जिल्ह्यासाठी डोकेदुखी ठरत चालल्या आहेत. सोशल मीडियावर स्टेटस, स्टोरी, रिल्स तयार करून एखाद्या चित्रपटाचा भंकस डायलॉग किंवा शिवीगाळ केलेला डॉयलॉग असलेल्या या व्हिडीओतून आपल्याच वयाच्या किंवा आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलांच्या मनावर आपले अधिराज्य गाजविण्याचा हा प्रयत्न जोरदार सुरु आहे. सोशल मिडियात चाकू, तलवार, गावठी कट्टा हातात घेऊन तयार केलेल्या व्हिडीओसोबत एखादे जोरदार कॅप्शन दिले कि गॅंग प्रमुखाची कॉलर कार्यकर्त्यांमध्ये टाईट होते. स्वतःच्या आयडीपुढे ३०२, ३०७ कलम, मॅटर, किंग, भाई लावून गल्लोगल्ली दादा होत चालले आहे.

आजकाल आपण पाहत असलेले बहुतांश अल्पवयीन मुले आणि तरुण सहज पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात अवैध धंधे, चोरी, लूटमारकडे वळले आहे. काहीच शक्य झाले नाही तर कुणीतरी बकरा पकडून त्याच्या जीवावर मजा मारण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. समाजात आणि आपल्या गॅंगमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना गुन्हेगारीचा अवलंब करावा लागतो आणि तिथेच सुरु होते वर्चस्वाची लढाई. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी खुन्नस द्यावी लागते आणि हाणामारी होते. शुद्धीत दहशत करणे प्रत्येकाला शक्य होत नसल्याने नशेचा आधार घेतला जातो. सध्या तरी जळगावात सर्वात सोपा नशा दारू आणि गांजा. उरले सुरले तर व्हाईटनर, बॉण्ड, भांग ठरलेलेच आहे. नशेत काहीतरी ठरवायचे आणि नशेतच ते करायचे अशा प्रवृत्तीतून गुन्हे घडत आहेत. काहींना कृत्याचा पश्चाताप होतो तर काहींना गावात हवा वाढल्याचा आनंद होतो.

https://www.instagram.com/__durlabh_kashyap_/?igshid=1igyy9vdow4an

मुळात या सर्वांची सुरुवात होते ती ‘दुर्लभ कश्यप’ या छोट्या गँगस्टरमुळे. छोटा आणि गँगस्टर कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. दुर्लभ कश्यप, जसे नाव तसा गुण… म्हणजे नाव तर दुर्लभ आहेच पण काम आणि गुन्हा दोन्ही दुर्लभ. एक विशेष ड्रेस कोड, धमक्या आणि सोशल मीडियाद्वारे टोळीचा प्रचार. उज्जैनचा सर्वात मोठा डॉन बनलेल्या या 20 वर्षाच्या मुलाची काम करण्याची ही पद्धत होती. वयाच्या 15-16 व्या वर्षी, जेव्हा मुले त्यांचा अभ्यास आणि भविष्याचा विचार करू लागतात, तेव्हा दुर्लभ कश्यप गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. दुर्लभची आई शिक्षिका आणि वडील व्यापारी होते. गुन्हेगारी जग बाहेरून दिसते तितके आकर्षक नाही, परंतु त्या 16 वर्षाच्या मुलाला या कामातून नाव आणि प्रसिद्धी हवी होती, ज्याचा परिणाम फक्त आणि फक्त मृत्यू आहे. वयाच्या 16 व्या वर्षी कश्यपने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला आणि दोन वर्षांनी उज्जैनमध्ये त्याच्या नावाचे नाणे चालू झाले. ‘जय महाकाल’चा जयघोष आणि गुन्हेगारीला वळण देण्याची त्याची पद्धत होती.

कपाळावर लाल टिळा, डोळ्यात अँटिमनी आणि खांद्यावर स्कार्फ, हीच दुर्लभ कश्यप आणि त्याच्या टोळीची ओळख होती. दुर्लभ कश्यप अनेकदा शस्त्रास्त्रांसह त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असे, लवकरच अल्पवयीन मुले आणि तरुण त्याच्या स्टाईलने प्रभावित होऊ लागले आणि मुले दुर्लभच्या टोळीत भरती होऊ लागले. दुर्लभच्या टोळीतील बहुतांश हल्लेखोर अल्पवयीन होते. दुर्लभने आपल्या फेसबुकवर लिहिले होते – “कुख्यात बदमाश, खुनी, व्यावसायिक गुन्हेगार, कोणत्याही वादासाठी संपर्क करा.”

दुर्लभ अशाच प्रकारच्या पोस्ट टाकायचा, ज्या तरुणांना आकर्षित करीत होत्या. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत दुर्लभवर ९ गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांसाठी देखील तो डोकेदुखी बनला होता. ऑक्टोबर 2018 मध्ये, दुर्लभला त्याच्या 23 साथीदारांसह पोलिसांनी अखेर पकडले. तेव्हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दुर्लभला सांगितले की, “तुमने बहुत ही कम उम्र में बहुतों से दुश्मनी मोल ले ली है, जेल में रहेगा तभी सुरक्षित रहेगा”। दुर्लभने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

https://z-p42.www.instagram.com/durlabh.official/

दुर्लभ तुरुंगात गेला पण टोळी सुरूच राहिली. कोरोनाच्या काळात जेंव्हा कारागृहातून बदमाशांची जामिनावर सुटका होऊ लागली, तेव्हा दुर्लभ देखील तुरुंगातून बाहेर आला. पोलीस अधिकाऱ्याचा इशारा तो विसरला गेला, परंतु गुन्हेगारीचे जग आपल्या शत्रूला कधीच विसरत नाही. 6 सप्टेंबर 2020 रोजी रात्री दुर्लभने घरी जेवण केले आणि आपल्या साथीदारांसह मध्यरात्री सिगारेट ओढण्यासाठी एका चहा टपरीजवळ पोहोचले. त्याच वेळी आणखी एक टोळीचा प्रमुख शाहनवाज त्याच्या साथीदारांसह येथे उपस्थित होता. दोन्ही टोळ्यांमध्ये पूर्वीपासूनच वैर होते, सिगारेटच्या दुकानात चर्चा वाढली आणि दोन्ही टोळ्यांमध्ये हाणामारी झाली. दुर्लभने शाहनवाजवर गोळी झाडली ती त्याच्या खांद्याला लागली. शाहनवाज आणि त्याच्या टोळीने दुर्लभवर चाकूने वार केले. शाहनवाजच्या टोळीतील कार्यकर्ते अधिक असून तो सतत चाकूने हल्ला करत होता. या घटनेत दुर्लभ कश्यपचा मृत्यू झाला. दुर्मिळावर चाकूने 34 वेळा वार करण्यात आले.

दुर्लभने वयाच्या 16 व्या वर्षी गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवले आणि गुन्हेगारी जगताचा पोस्टर बॉय म्हणून वयाच्या 20 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. दुर्लभ या जगातून गेला पण उज्जैनमध्ये अजूनही त्याच्या नावाने टोळ्या सुरू आहेत. दुर्लभच्या नावाने आजही सोशल मीडियात अनेक खाते सुरु असून त्याचाच टोळीतील काही कार्यकर्ते, त्याला रोल मॉडेल समजणारे युवा गुंड ते हाताळत असतात. दुर्लभचे नाव सर्वसामान्यांना परिचित नसले तरी युवावर्गात तो फार लोकप्रिय आहे. दुर्लभचा मृत्यू झाला असला तरी त्याची दहशत किंवा फॅन फॉलोईंग अद्याप कमी झाली नसून ती वाढतच आहे. जळगावात देखील दुर्लभचे दिवाने खूप असून लहान मोठ्या हाणामाऱ्या असो किंवा खून करणारी तरुणाई त्याचाच कुआदर्श घेत पुढे जात आहे. दुर्लभला रोल मॉडेल मानणाऱ्यांसाठी तो तेव्हाही हिरो होता, आजही आहे आणि उद्याही असणार. कदाचित त्याच्यासारखे आणखी काही तयार देखील होत असतील.

जळगावात गेल्या तीन महिन्यात घडलेल्या काही घटनांचा अभ्यास केला असता क्षुल्लक कारणावरून खून आणि प्राणघातक हल्ला केल्याचे प्रकार घडले आहे. तरुणाईच्या हाती चाकू, सुरे, तलवारी, गावठी कट्टे सहज उपलब्ध झाले असून एखाद्याचा जीव घेणे म्हणजे स्वतःची मोठाईकी करून घेण्यासारखे आहे. जळगावातील दुर्लभ कश्यप गॅंगचे पोलिसांनी आणि काही समाजसेवकांनी आज समुपदेशन केले तर उद्याचे उज्ज्वल जळगाव घडू शकते. अन्यथा १९८० च्या दशकातील गुंडगिरीचे जळगाव पुन्हा २१ व्या शतकातील तरुणाईला पाहायला मिळेल यात शंका नाही.

एकीकडे दुर्लभ कश्यप सारख्या गुंडगिरीला प्रोत्साहन देऊ नये अशी मागणी होत असली तरी दुसरीकडे दुर्लभच्या आयुष्यावर चित्रपट येत असल्याची चर्चा आहे. दुर्लभच्या समर्थकांनी सोशल मीडियात चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले असून मनीष भट्ट दिग्दर्शित चित्रपटात जय रंधावा प्रमुख भूमिका साकारत असल्याचे त्यात म्हटले आहे. दुर्लभच्या आयुष्यावर खरोखर चित्रपट आल्यास त्याचा सकारात्मक परिणाम तर नव्हेच पण बालकांवर त्याचे प्रचंड दुष्परिणाम होतील हे तितकच खरे आहे.