⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

समर्थकांच्या प्रेमामुळे सुरेशदादांचे हाल..

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांना घरकूल प्रकरणात नियमीत जामीन मिळाल्याने ते बुधवारी रात्री जळगावात आले. सुरेशदादांवर प्रेम करणारा आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग जळगावात आहे. बऱ्याच कालावधीनंतर सुरेशदादा जळगावात परतणार असल्याने समर्थकांनी रेल्वेस्थानकावर त्यांचे जंगी स्वागत केले. वयाच्या ८० व्या टप्प्यावर असताना देखील सुरेशदादा आजही ‘फिट अँड फाईन’ दिसून आले. समर्थकांची गर्दी इतकी होती की एखाद्या तरुणाला देखील श्वास घ्यायला त्रास होईल, अशात ८० वर्षाचा तरुण कसाबसा मार्गक्रमण करीत पुढे सरकला. सुरेशदादांवर असलेले आपले प्रेम दाखविताना त्यांना त्रास होऊ नये याची काळजी समर्थकांनी घेतलीच नाही फक्त मोजके ६ चेहरे किल्ला लढवत होते.

जळगाव शहर म्हटले की सुरेशदादा जैन हे नाव येतेच. शहरात ४० वर्ष सत्ता गाजविणाऱ्या सुरेशदादा जैन यांना घरकूल घोटाळा प्रकरणात कारागृहात जावे लागले. न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यावर बराच काळ ते कारागृहातच होते. वाढते वय आणि आरोग्याच्या कारणास्तव त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता मात्र त्या कालावधीत त्यांना मुंबईतच राहावे लागणार होते. सुरेशदादा कारागृहात आणि मुंबईत असताना जळगाव शहरात मोठ्या घडामोडी घडून गेल्या. शहराचा विकास रखडला.

अखेर काही दिवसापूर्वी सुरेशदादा जैन यांना न्यायालयाने नियमीत जामीन मंजूर केला आणि जळगावात येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. मोठ्या कालावधीनंतर आपले नेते आणि प्रेरणास्थान येणार असल्याने समर्थक शांत बसतील असे शक्यच नव्हते. सुरेशदादांच्या स्वागतार्ह जळगाव स्थानकावर सायंकाळपासूनच समर्थकांचा मोठा जमाव जमला होता. ढोल, ताशांच्या गजरात, फटाके फोडून आणि पुष्पवृष्टी करीत सुरेशदादा जैन यांचे स्वागत करण्यात आले.

अगोदरपासूनच शरीर आणि आरोग्याच्या बाबतीत जागरूक असलेले सुरेशदादा जैन आज देखील त्याच रुबाबात दिसून आले. तोच उत्साह, तोच तजेलदारपणा, रांगडा आवाज, कडक कपडे आणि प्रत्येकाला देण्यासाठी वेळ हे सर्वच रेल्वेस्थानकावर पाऊल ठेवताना पाहायला मिळाले. ८० चा टप्पा गाठत असलेल्या सुरेशदादांच्या मानाने वयाचा काहीसा परिणाम जाणवला मात्र तो केवळ समर्थकांच्या गर्दीमुळे. शेकडोंच्या जमावाने सुरेशदादा जैन यांना गराडा घातला, खांद्यावर उचलून घेत नाचले. एकंदरीत प्रत्येकाने आपला आनंद आणि प्रेम व्यक्त केले. रेल्वे फलाटहुन बाहेर वाहनापर्यंत यायला संपूर्ण मंडळीला जवळपास पाऊण तास लागला.

गर्दीत कार्यकर्ते बिलकुल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. समर्थकांची गर्दी इतकी होती की अनेकांना गुदमरल्या सारखे झाले. धक्काबुक्की अनेकांना मुक्कामार बसला. काहींचे मोबाईल चोरी झाले तर काहींचे पाकीट गेले. गर्दीत सुरेशदादा जैन यांना देखील हालचाल करण्यास जागा नव्हती. एस्क्लेव्हेटर जिना आणि लिफ्ट देखील गर्दीने खच्चून भरली होती. गर्दीत सुरेशदादांना त्रास होत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवले मात्र त्यांनी कुणालाही न अडवता सर्व सहन केले. अखेर लिफ्टमधून बाहेर पडल्यावर पोलिसांनी हाताची साखळी केली आणि सुरेशदादा जैन यांना वाहनापर्यंत पोहचविले. वाहनात पण समर्थक खच्चून बसले.

अर्ध्या तासाच्या काळात जिना गर्दीने भरलेला असल्याने इतर प्रवाशांना देखील त्याचा फटका बसला. आपल्यामुळे इतरांना त्रास झाला हे सुरेशदादा जैन यांना नक्कीच आवडले नसणार. सुरेशदादा जैन जळगावात येणार होते हे माहिती असताना रेल्वेस्थानकावर गर्दी करून अतिउत्साही समर्थकांना काय मिळाले? जिन्यावर कुठेतरी लटकून उभे असताना एखादा खाली कोसळला असता तर कोण जबाबदार असते? आपल्यामुळे नेत्याला त्रास झाला, एखादा अपघात झाला तर नेत्याचे नाव खराब झाले असते. अटकेनंतर २ वेळेस समर्थकांच्या अतिउत्साहीपणामुळे सुरेशदादांना त्रास झाला होता हे काही समर्थक विसरले. गर्दीत न जाता नंतर घरी भेटण्यात स्वारस्य मानणारे समर्थक खरंच चांगले ठरले. एकतर स्वतःचे आणि नेत्याचे हाल झाले नाहीत शिवाय घरी नीट भेट देखील झाली. मागील आणि कालचा अनुभव लक्षात घेता कार्यकर्ते पुढीलवेळी काही बोध घेतील अशी अपेक्षा.