जळगावकरांनो काळजी घ्या! उन्हाच्या पाऱ्याने ओलांडली चाळीशी..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२३ । राज्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाचे संकट ओढवले होते. ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी उन्हाचा पारा काहीसा घसरला होता. मात्र आता हळूहळू तापमानाचा पारा वाढू लागला आहे. जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील उन्हाचा पारा 40 अंशावर गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पुढील काही दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

काही दिवसापूर्वी जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. त्यात शेतीपिकांचे नुकसान झाले. अशातच कधी कधी कडक उन्हात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने दुहेरी हवामानाचा अनुभव जळगावकर घेत आहेत.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक हॉट शहर म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराचा पारा बुधवारी तब्बल 43.3 अंशावर नोंदवण्यात आल्याची माहिती शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने दिली. आज दुपारी जळगावचा पारा 40 अंशावर दिसून आला. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात उन्हाच्या पाऱ्याने 40 शी ओलांडली असून मे महिन्यात काय होणार? या चिंतेने जळगावकरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. 

सध्या सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. सकाळच्या सत्रात अंगाला चटके देणारं उन्ह असतं,दुपारी उकाडा जाणवतो तर रात्रीच्या सुमारास घामानं जळगावकरांचं अंग चिंब होतं असं चित्रविचित्र वातावरण सध्या सर्वत्र दिसून येत आहे.