⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बरडेभाऊ जशी मुख्यमंत्री व खासदाराची तुलना होवू शकत नाही तशी नगरसेवक व खासदाराची कशी होईल?

बरडेभाऊ जशी मुख्यमंत्री व खासदाराची तुलना होवू शकत नाही तशी नगरसेवक व खासदाराची कशी होईल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरुन भुमिका मांडल्यानंतर खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची आग्रही भूमिका मांडली. त्यानंतर राणा दांम्पत्य विरुध्द शिवसेना असा सामना रंगला आहे. हे राजकारण दोन्ही बाजूने पेटल्याने हा वाद आता राज्यभरात पोहचला आहे.

जळगावमध्ये देखील शिवसेनेने राणा दाम्पत्यांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. अर्थात राजकारणात असे विषय नवे नाहीत. मात्र अशातच जळगाव महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक ललित बरडे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी म्हटले आहे की,

नवनीत राणा…. माझ्या वार्डात निवडून येऊन दाखवा?
मा.उद्धव साहेब यांना काय आव्हान देतात ती तुमची पात्रता नाही. माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना पराभूत करून दाखवा. या माझ्या वार्डात आणि मला पराभूत करून दाखवा. कुठे उद्धव साहेब…. कुठे तुम्ही…
आभाळा वरती थुंकती कळप छाकटे
त्यांच्या थुंकण्याने का होईल आभाळ धाकटे
तुम्हाला तुमची जागा दाखवायला मी पुरेसा आहे.

जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील शिवसेनेचे नगरसेवक असलेले नितीन बरडे यांची पोस्ट जळगावमध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसैनिकांनी या पोस्टचे जोरदार स्वागत केले आहे. मात्र काहींनी यास चमकोगिरीचा फंडा असे म्हटले आहे. काहींनी तर बरडे यांच्याच पोस्टमधील कुठे उद्धव साहेब…. कुठे तुम्ही…या वाक्यावर बोट ठेवत, कुठे एक खासदार आणि कुठे एक नगरसेवक अशी वस्तुस्थितीची जाणीव करुन दिली आहे.

अर्थात एका अर्थाने त्याला चुकीचे देखील म्हणता येणार नाही. कारण जसे एक मुख्यमंत्री व एका खासदाराची तुलना होवू शकत नाही. खासदार केवळ त्यांच्या मोजक्या तालुक्यांचे प्रतिनिधीत्व करत असतात तर मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे प्रतिनिधीत्व करतात. शिवाय मुख्यमंत्री पद मोठेही आहे व या पदाला मान देखील आहे. यामुळे राज्यातील आमदार, खासदारच काय तर मंत्रीमंडळातील अन्य मंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांचा मान ठेवावाच लागतो. यामुळे मुख्यमंत्री व खासदाराची तुलना होवूच शकत नाही.

याच धर्तीवर एक खासदार व एका नगरसेवकाचीही तुलना होवूच शकत नाही. कारण नगरसेवक संबंधीत शहरातील एका छोट्याच्या वॉर्डचे प्रतिनिधीत्व करतात त्यात जेमतेम दोन- तीन हजार मतदार असतात. त्या तुलनेत खासदारांचे कार्यक्षेत्र प्रचंड मोठे असतेत. त्यांच्या मतदार संघात किमान पाच ते सहा तालुक्यांचा समावेश असतो. जळगाव महापालिकेतील नगरसेवक व जळगाव लोकसभा मतदारसंघाची तुलना करावयाची म्हटल्यास जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव महापालिकेत तब्बल ७५ नगरसेवक आहेत, त्यापाठोपाठ चाळीसगाव येथे ३३, अमळनेर ३३, पाचोरा २५, पारोळा २०, धरणगाव १९, एरंडोल १८ व भडगाव येथेही १८ असे एकूण २४१ नगरसेवकांपैकी बरडे एक नगरसेवक आहे. यामुळे जशी मुख्यमंत्री व खासदारांची तुलना होवू शकत नाही तशीच एक खासदार व एक नगरसेवकामध्ये तुलना होवू शकत नाही, असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह