जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी असून शहरातील डॉ. ए. जी. भंगाळे यांचे समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे आता महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना यशस्वीपणे सुरू करण्यात आल्या आहेत. या शासकीय योजनांमुळे गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प खर्चात किंवा मोफत दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होऊन, स्थानिक पातळीवरच आधुनिक उपचार सुविधा नागरिकांना मिळणार आहेत.

रुग्णालयामध्ये अत्याधुनिक कॅथलॅब सुविधा सुरू करण्यात आली असून, हृदयविकाराशी संबंधित एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टीसारख्या महत्त्वपूर्ण उपचार सेवा आता उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे या सेवा महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेंतर्गत पात्र रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचार टाळणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, वेळेत योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

याचबरोबर पात्र रुग्णांसाठी इतर विविध गंभीर व सामान्य आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा देखील योजनेंतर्गत उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना हृदयविकार, शस्त्रक्रिया, आपत्कालीन उपचार तसेच इतर आवश्यक आरोग्यसेवा एकाच ठिकाणी आधुनिक सुविधांसह मिळणार आहेत.
डॉ. ए. जी. भंगाळे सर यांची गेल्या ५० वर्षांपासूनची निस्वार्थ वैद्यकीय सेवा, रुग्णांप्रती असलेली बांधिलकी आणि समाजसेवेची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा यांच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन करत आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे आणि सेवाभावी दृष्टिकोनामुळे हजारो रुग्णांना नवजीवन मिळाले असून, आजही रुग्णसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे नागरिकांना विश्वासार्ह, अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या शासकीय योजनांचा व उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.












