जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. याच वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कार्यालयात योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, कच्ची व पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स) चाचणी आदी कामांसाठी येणाऱ्या वाहनमालक, चालक व अनुज्ञप्तीधारकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यालयाच्या अपॉइंटमेंट वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयातील पूर्वीच्या अपॉइंटमेंट वेळेत बदल करून नवीन वेळ सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. ही वेळ तात्पुरत्या स्वरूपात लागू राहणार आहे.

तसेच सर्व नागरिक, वाहनधारक व अनुज्ञप्तीधारक यांनी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच कच्ची व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी वरील कालावधीतच अपॉइंटमेंट घेण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जळगाव यांनी केले आहे.












