चोपडा

आत्मनिष्ठ सेवा फाउंडेशनच्या ‘एक दिवा माणुसकीचा’ उपक्रमातून १२० कुटुंबांची दिवाळी गोड

उत्तमनगर, सत्रासेन येथे आदिवासी शेतकरी कुटुंबांना दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप…

जळगाव लाईव्ह न्यूज । आत्मनिष्ठ सेवा फाउंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त राबविण्यात आलेला ‘एक दिवा माणुसकीचा’ हा विशेष सामाजिक उपक्रम चोपडा तालुक्यातील उत्तमनगर, सत्रासेन येथील आदिवासी पाड्यावर यशस्वीरीत्या संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत परिसरातील १२० गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यंदा राज्यासह देशातील विविध भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी बांधव आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. पिकांचे झालेले नुकसान, आर्थिक विवंचना आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यामुळे अनेक कुटुंबांसमोर विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांतील मुलांच्या शैक्षणिक गरजांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून आत्मनिष्ठ सेवा फाउंडेशनने यंदाची दिवाळी आदिवासी पाड्यावरील शेतकरी बांधवांसोबत साजरी करण्याचा संकल्प केला.

समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सहकार्यामुळे १२० कुटुंबांपर्यंत दिवाळीचा फराळ आणि शैक्षणिक साहित्य पोहोचविण्यात संस्थेला यश आले. विशेष म्हणजे, यंदा फटाक्यांवर खर्च न करता गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून माणुसकीची दिवाळी साजरी करण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या व समुपदेशक सुचित्रा महाजन आणि युवराज महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. योगेश माळी, श्री. प्रवीण देशमुख, चेतन राठोड, रोहन महाजन, प्रथमेश मराठे, रोशनी रोहिमारे आणि प्रमोद माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी आदिवासी पाड्यावरील शेतकरी, महिला, युवक-युवती तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button