
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावहुन दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने जळगाव ते पानिपतदरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे आज बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जळगावहून रवाना होणार असून, या विशेष रेल्वेमुळे जळगाव, भुसावळ आणि मार्गावरील प्रवाशांना उत्तर भारताच्या दिशेने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.
रेल्वे क्रमांक ०१०६७ ही जळगाव-पानिपत विशेष रेल्वे बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव स्थानकावरून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी, गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ही गाडी पानिपत स्थानकावर पोहोचेल.
परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ०१०६८ ही विशेष गाडी गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पानिपत येथून सुटेल. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी ती जळगाव स्थानकावर पोहोचणार आहे.
भुसावळसह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबे
या विशेष रेल्वेला भुसावळ, खंडवा, भोपाळ, बिना, आग्रा कॅन्ट, पलवल आणि नवी दिल्लीसह मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना उत्तर भारतात जाण्यासाठी या रेल्वेचा लाभ घेता येणार आहे. प्रवासापूर्वी प्रवाशांनी अधिकृत वेळापत्रकानुसार थांब्यांची खात्री करावी.
स्लीपरचे १०, तर जनरलचे सात डबे
जळगाव-पानिपत विशेष रेल्वेला एकूण १९ डबे असणार आहेत. त्यामध्ये शयनयान श्रेणीचे १० डबे, सामान्य द्वितीय श्रेणीचे सात डबे आणि दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल सुविधा असलेले द्वितीय श्रेणीचे आसनासह गार्ड ब्रेक व्हॅनचे दोन डबे असतील. त्यामुळे आरक्षित तसेच अनारक्षित श्रेणीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.
तिकीट बुकिंग आणि वेळापत्रक कुठे पाहाल?
प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी ‘RailYaan’ ॲपचा वापर करता येईल. तसेच या विशेष रेल्वेचे थांबे, वेळापत्रक आणि अन्य तपशील जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेची अधिकृत चौकशी वेबसाइट किंवा NTES ॲपवर माहिती तपासता येईल. सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी ही विशेष रेल्वे उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.



