रेल्वे

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरसाठी विशेष गाड्यांची घोषणा; चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळला थांबे

जळगाव लाईव्ह न्यूज । धम्मचक्र प्रवर्तन दिन-२०२६ निमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे येथून नागपूरसाठी विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूरदरम्यान सहा, तर पुणे-नागपूरदरम्यान चार फेऱ्या होणार आहेत. या विशेष गाड्यांना चाळीसगाव, पाचोरा, जळगावसह भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई-नागपूरदरम्यान विशेष गाड्यांच्या सहा फेऱ्या

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, विशेष गाडी क्रमांक ०१२१९ ही १८ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दुपारी २.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२२० ही १९ ऑक्टोबर रोजी नागपूरहून रात्री १०.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.२० वाजता मुंबईला पोहोचेल.

याशिवाय, गाडी क्रमांक ०१०१९ ही १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी मुंबईहून दुपारी २.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०२० ही २० आणि २२ ऑक्टोबर रोजी नागपूरहून रात्री १०.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.२० वाजता मुंबईला पोहोचेल.
या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी

पुणे-नागपूरदरम्यानही विशेष अनारक्षित गाड्या

पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०१२१५ ही १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानकातून दुपारी २.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता नागपूरला पोहोचेल.तर गाडी क्रमांक ०१२१६ ही २० आणि २२ ऑक्टोबर रोजी नागपूरहून रात्री ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.२० वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.

जळगाव, भुसावळसह या स्थानकांवर थांबे

पुणे-नागपूर विशेष गाड्यांना दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही नागपूरला जाण्यासाठी पर्यायी रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.

या गाड्यांसाठी आरक्षणाची आवश्यकता नसून, प्रवाशांना यूटीएस मोबाइल ॲप किंवा रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीतून तिकीट घेता येणार आहे. या गाड्यांमध्ये मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणे सामान्य भाडे आकारले जाणार आहे. विशेष गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रक जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करावा आणि या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button