
जळगाव लाईव्ह न्यूज । दसरा, दिवाळी आणि छठ पूजेच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळमार्गे आणखी एक विशेष अमृत भारत एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते अयोध्या कॅन्टदरम्यान अमृत भारत रेकद्वारे २४ साप्ताहिक विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबई आणि अयोध्या येथे जाण्यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
गाडी क्रमांक ०१०४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कॅन्ट सुपरफास्ट विशेष रेल्वे १९ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान दर सोमवार आणि शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी मुंबईहून सकाळी ७.३५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ वाजता अयोध्या कॅन्ट येथे पोहोचेल. या दिशेने एकूण १२ फेऱ्या होणार आहेत.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०४६ अयोध्या कॅन्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वे २० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवार आणि शनिवारी धावणार आहे. ही गाडी अयोध्या येथून दुपारी १.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.१५ वाजता मुंबईत पोहोचेल. परतीच्या दिशेनेही १२ फेऱ्या नियोजित आहेत.
भुसावळसह अनेक स्थानकांवर थांबा
या विशेष रेल्वेला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगड आणि सुलतानपूर येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे भुसावळ आणि परिसरातील प्रवाशांना मुंबई तसेच अयोध्येला जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
अमृत भारत रेकमध्ये असणार हे डबे
या विशेष गाडीमध्ये आठ स्लीपर क्लास, ११ जनरल सेकंड क्लास, एक पॅन्ट्री कार आणि दोन सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन असतील. सणासुदीच्या काळातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ही विशेष सेवा सुरू करण्यात येत आहे.



