अतिक्रमण हटाव मोहिमेचा वेग वाढला; जळगावात अनधिकृत टपऱ्यांवर हातोडा, ५ वाहने ताब्यात..

एप्रिल 23, 2026 3:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२६ । शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने सुरू केलेली मोहीम आज गुरुवारी (२३ एप्रिल) अधिक तीव्र झाली. आजच्या कारवाईत प्रशासनाने शासकीय तंत्रनिकेतन ते मानराज पार्क या महत्त्वाच्या मार्गावरील अनधिकृत दुकाने आणि टपऱ्या जमीनदोस्त केल्या असून, ५ वाहनेही जप्त केली आहेत.

atikraman 1

गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) ते मानराज पार्क या महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावर विनापरवाना टपऱ्या आणि दुकानांचे पेव फुटले होते. यामुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडी होत होती. आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात या मार्गावर धडक कारवाई केली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकामे आणि शेड्स काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

विनापरवाना वाहनांवरही कारवाई
केवळ टपऱ्याच नव्हे, तर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवरही पथकाने कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणारी ५ वाहने यावेळी जप्त करून महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आली आहेत. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे महामार्गावरील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, या कारवाईबाबत अधिक माहिती देताना महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांनी सांगितले की, “शहराच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे पूर्णपणे निघेपर्यंत ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. नियम डावलून रस्ते अडवणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now