जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२६ । जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून, या भीषण उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच जळगाव महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा (AC) बंद असल्याने तीव्र उन्हामुळे आणि उकाड्याने नगरसेवक प्रचंड बेहाल झाले होते.

आज गुरुवारी जळगाव महानगरपालिकेची महासभा महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. शहरातील विविध नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्व नगरसेवक सभागृहात एकत्र आले होते. मात्र, चर्चा सुरू असतानाच सभागृहातील वाढत्या तापमानामुळे सर्वांची अंगाची लाही लाही होऊ लागली.

महानगरपालिकेच्या या मुख्य सभागृहातील एसी अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भर उन्हाळ्यातही ही यंत्रणा दुरुस्त न केल्याने आज महासभेत नगरसेवकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. उकाड्यामुळे नगरसेवकांचा जीव कासावीस झाला होता, ज्यामुळे काहींना आपले लक्ष कामकाजावर केंद्रित करणेही कठीण झाले.
सभागृहातील या दुरवस्थेवर नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. “सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही येथे येतो, मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लोकप्रतिनिधींनाच अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे,” अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केली. ही यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे केली आहे.











