⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जळगावच्या माधवी पाटील खेळणार ‘कोण होणार करोडपती’ खेळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी होत असतात. प्रत्येक स्पर्धकाची जीवनकहाणी वेगळी असते. प्रत्येकाचा प्रवास, संकट आणि त्यावर मिळवलेली मात वेगळी असते. माणसावर आलेली वाईट वेळ एकतर त्याला धैर्यवान बनवते किंवा कमकुवत. समोर आलेल्या संकटाला धीराने तोंड देणारी धैर्यवान माणसं त्या संकटातून यशस्वीपणे बाहेर पडतात आणि नवा इतिहास रचतात.

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरही एक अशीच धैर्यशील आणि यशस्वी स्त्री आणि आई सहभागी होणार आहे. जळगाव येथील चोपडा तालुक्यातील माधवी पाटील स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. येत्या २९ जुन २०२२ रोजी ,रात्री ९ वाजता जळगाव येथील चोपडा तालुक्यातील माधवी पाटील कोण होणार करोडपती’ खेळ खेळणार आहे तेव्हा पहायला विसरू नका कोण होणार करोडपती’, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

माधवी पाटील या आदिवासी विकास विभागात कनिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहेत. माधवी यांचीमुलगी विशेष पाल्य आहे. ती जन्माला आली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले कि हि २- ३ दिवसात मरून जाईल त्यामुळे हिला एनआयसीयु (NICU) मध्ये ठेवण्यात काही अर्थ नाही, तुम्ही हिला घरी घेऊन जा. सगळ्या डॉक्टरांकडून नकारात्मक गोष्टी ऐकूनही त्यांनी अपल्या मुलीला घरी आणून व्यवस्थित वाढवले आहे. ती आता ११ वर्षांची आहे आणि तिच्या हृदयात होल असल्यामुळे आलेल्या सगळ्या संकटाना दोघीही धीटपणे सामोऱ्या गेल्या.

माधवी पाटील म्हणाल्या की , देवासाठी मी स्पेशल आहे म्हणून माझी मुलगी स्पेशल चाईल्ड आहे . लोकांची विशेष अपंग मुलांकडे बघायची पद्धत माधवी यांना अजिबात आवडत नाही. माधवी यांना ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून सर्वांना हे समजवायचं आहे की विशेष अपंग मुलांना आपण इतर मुलांसारखंच वागवलं पाहिजे, त्यांच्याशी तसाच संवाद साधला पाहिजे, त्यांच्यावर तसेच प्रेम केले पाहिजे.अशा कुठल्याही संकटाला सकारात्मकतेने सामोऱ्या जाणाऱ्या आणि हसतमुख स्वभावाने कायम यश संपादन करणाऱ्या माधवी पाटील यांची जीवनकहाणी इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.