---Advertisement---
विशेष

इन्सायडर स्टोरी : बाप तो बाप रहेगा..!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात प्रथमच पोलीस, महसूल आणि आरटीओ विभागाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली. ५३ ट्रॅक्टर आणि १४ डंपर, ट्रक पथकाने बांभोरी गावातून ताब्यात घेतले. अतिशय गोपनीय पद्धतीने भल्या पहाटे यशस्वीरित्या पार पडलेल्या कारवाई मागे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे मायक्रो सिक्रेट प्लॅनिंग कारणीभूत आहे. पोलिसांनी कारवाई केली हे सर्वांना माहिती आहे मात्र का केली यामागील काही कारणे महत्त्वाची आहेत. कुणाच्याही दबावाला न जुमानता केलेल्या कारवाईमुळे जिल्हाभरातील वाळूमाफिया कमालीचे धास्तावले आहेत.

Jalgaon Insider Story jpg webp webp

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) बरेच गावगुंड विशेषतः तरुण गेल्या काही वर्षात अवैध धंद्याच्या नादी लागले आहेत. सट्टा, पत्ता, जुगार, कुंटन खाना व्यवसायात आणि खास करून अवैध वाळू वाहतुकीच्या बळावर कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची सवय तरुणाईला लागली. झोपडपट्टी बहुल भागासह इतरही भागातील तरुण आणि प्रौढ यात उतरू लागले. सुरुवातीला मोजकेच असलेल्या गावगुंडांनी आपल्या गँग तयार केल्या. राजकारण्यांची साथ मिळू लागल्याने गुंड सुसाट झाले आणि त्यातच काही प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हफ्तेखोरीने त्यांना बळ मिळाले. अवैध धंद्यात पैशांचा पाऊस होऊ लागल्याने मोजकेच वरचढ झाले आणि मग सुरू झाली स्पर्धा.

---Advertisement---

स्पर्धेत गँगवार रंगू लागले आणि बंदुका, चाकू, सुरे चालले. सावकारी धंद्याने त्यात भर टाकली. गुंडांना आर्थिक रसद मिळू लागली सोबतच जास्तीची आमदनी होऊ लागली. पैसा खेळता राहू लागल्याने काही जण स्वतःला बादशाह समजू लागले. भांडणं, वाद कुणाची असो मध्यस्थी करायला हेच ठेकेदार जाऊ लागले. पोलीस ठाणे असो की महसूल कार्यालये सर्व प्रकरणे त्यांनीच पार पाडायची असा पायंडा पडला. काही गुंड स्वतःला सर्वांचा बाप समजत असल्याने जिथे तिथे प्रशासनाला ते बॉयकॉट करीत दुय्यम स्थान देत होते.

वाळूमाफियांकडून पोलीस आणि महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अनेकदा झाले, किंबहुना ते आता नित्याचेच होऊ लागले होते. वाळूमाफियांचा उपद्रव जिल्ह्यात इतका वाढला की अखेर माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले आणि प्रशासनाला मानवी हक्क आयोगाची नोटीस पोहचली. दुसरीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी नेहमीप्रमाणे तक्रारी आणि आरोप करणे सुरूच ठेवले. मावळते जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना ते चांगलेच भारी पडले. वाळूमाफियांनी पाच दिवसापूर्वी एक पंगा घेतला आणि तिथेच ते चुकले.

पाळधी येथे गोमांस असल्याच्या संशयावरून एक ट्रक अडविण्यात आला. कोणतीही खात्री न करता बांभोरी येथील काही तरुणांनी जमाव बोलविला. पोलीस शांतता राखण्याचे आवाहन करीत असताना काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली. एकाने तर चक्क परिरक्षावधीन उपअधीक्षक आप्पासो पवार यांना गर्दीतच ‘ओपन चॅलेंज’ दिले आणि तिथेच खटका पडला. कारण गोमांस वाहतुकीचा संशय दिसत असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून आप्पासो पवार वाळूमाफियांवर करीत असलेली कारवाई तरुणांना खटकली होती. आपला बदला घेण्याच्या दृष्टीने काहींनी पोलिसांवर दगडफेक केली. पवार स्वतः देखील जखमी झाले. काहींनी ट्रकवर हल्ला करीत ट्रक जाळला.

पोलिसांवर हल्ला झाला आणि तेव्हाच जिल्ह्यात येणारा प्रत्येक अधिकारी सारखाच असतो असा समज खोटा ठरवण्याची वेळ आली. मानवी हक्क आयोग नोटीस, पोलिसांवरील हल्ला, माहिती अधिकार कार्यकर्त्यांची तक्रार आणि दररोज होत असलेले आरोप लक्षात घेता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी मायक्रो प्लॅन आखला. आपलेच फितूर होऊ नये म्हणून सर्वांना गाफील ठेवले. पाळधी घटनेत पोलिसांचे जागरण झालेले असताना देखील पुन्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेची वेळ निश्चित करण्यात आली. योगायोगाने तो दिवस शनिवार ठरला. अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर कारवाईचे नाव करीत गनिमी कावा खेळला होता. काही पथक बांभोरी पुलाजवळ तर काही पाळधी येथे थांबून असताना मुक्ताईनगरच्या दिशेने निघालेल्या पथकाने यु टर्न घेतला आणि कारवाईला सुरुवात झाली.

आपल्यावर कारवाई होणारच नाही आणि जर झालीच तर आपण सहज पळून जाऊ असा अतीआत्मविश्र्वास बाळगून असलेले वाळूमाफिया प्रशासनाच्या सापळ्यात अडकले. नेत्यांना जाग आली तोवर ६५ पेक्षा अधिक वाहने पोलिसांनी पकडली होती. १०.३० च्या सुमारास नेत्यांचा फोन आला आणि त्यानंतर कारवाई आटोपती घेण्यात आली मात्र तोवर मिशन फत्ते झाले होते. पोलीस आणि महसूल प्रशासनाने दाखवून दिले की ‘बाप तो बाप रहेगा’. जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर केलेल्या कारवाईमुळे आज अनेकांचे धाबे दणाणले असले तरी अद्यापही गिरणा, तापी, वाघूर काठच्या अनेक गावात ट्रॅक्टर, डंपर, ट्रक लावून माफिया बसलेले आहेत. शहरातील मातब्बर वाळूमाफिया देखील अद्याप बिनधास्त असून त्यांच्यावर कारवाई करून प्रशासनाला आपला दबदबा दाखविणे गरजेचे आहे.

आजच्या कारवाईचे सर्व श्रेय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, आरटीओ विभाग आणि सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाते. एक विशेष सांगायचे राहिलेच.. भल्या पहाटेपासून सुरू झालेल्या कारवाईनंतर पोलिसांनी सर्व वाळूमाफियांसाठी नाश्ता, पाण्याची व्यवस्था देखील केली. इतकंच नव्हे तर एका तरुणाच्या पायाला इजा झाली तर त्यासाठी प्रथमोपचार देखील पोलिसांनी करून दिले. कुणालाही मारहाण न करता शांततेत केलेली कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे.

  • चेतन वाणी, जळगाव

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---