जळगाव लाईव्ह न्यूज । सणासुदीचा काळ आणि आगामी लग्नसराई लक्षात घेता सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून घसरणीचा कल असलेल्या सोन्याच्या दरात अचानक मोठी तेजी आली आहे. गुरुवारी सोन्याच्या किमतीत जोरदार वाढ झाली असून, चांदीच्या दरानेही मोठी उसळी घेतली आहे.

Goodreturns नुसार, जळगावच्या सराफ बाजारात गुरुवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ३,३३० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५५ हजार ३५० रुपये प्रति तोळा झाला आहे.

याशिवाय २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३,०५० रुपयांची वाढ झाली असून, त्याचा भाव १ लाख ४२ हजार ४०० रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर २,४९० रुपयांनी वाढून १ लाख १६ हजार ५१० रुपये प्रति तोळा झाला आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
चांदीच्या दरातही ५ हजारांची वाढ
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही गुरुवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या दरात प्रति किलो ५ हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीचा भाव आता २ लाख ५० हजार रुपये प्रति किलो झाला आहे.
पुढील काळात दर आणखी बदलणार?
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि अमेरिकन बाँड यील्ड यासह विविध घटकांचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सणासुदीच्या काळात खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी दागिन्यांच्या किमतीसोबतच मेकिंग चार्ज आणि इतर शुल्काची माहिती घेऊनच खरेदी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.










