जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून सोने दरात चढ-उतार सुरु आहे. मागच्या काही दिवसापूर्वी सोन्याच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला ताण दिला होता. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या खरेदीदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

आज १ सप्टेंबर रोजी जळगाव बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल १,०५० रुपयांची घसरण झाली आहे. सलग वाढणाऱ्या किमतींमुळे अनेकांनी सोने खरेदीचा विचार लांबणीवर टाकला होता, परंतु आजच्या या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही; चांदीचे दर स्थिर आहेत.

सध्याचे दर (जीएसटीसह)
सोने (१० ग्रॅम): जीएसटीसह १ लाख ५८ हजार ५६८ रुपये इतके झाले आहेत.
चांदी (१ किलो): जीएसटीसह २ लाख ४६ हजार १७० रुपये इतके कायम आहेत.
सप्टेंबरच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे आगामी काळात दर आणखी कमी होणार का, याकडे ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.










