जळगाव लाईव्ह न्यूज । खासगी शिकवणी (क्लासेस) घेणाऱ्या एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे संशयास्पद प्रकरण बोदवड तालुक्यात समोर आल्यानंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या जमावाने संशयिताचे मूळ गाव गाठून वाहनांची जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक केली. घटनेचे गांभीर्य ओळखून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाभरातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोदवडमध्ये तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा तालुक्यातील एका गावातील मूळ रहिवासी असून त्याचे बोदवड शहरात भुसावळ रस्त्यावरील एका इमारतीत खासगी शिकवणी वर्ग आहेत. तिथे तो इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. याच दरम्यान त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर ही घटना गावात वेगाने पसरली.

घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आले. संतप्त नागरिकांनी थेट आरोपीच्या घराकडे मोर्चा वळवत त्याच्या कारला आग लावली. काही जणांनी आरोपीला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले. त्याला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, यानंतर जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरातही आक्रमक भूमिका घेतली.
यावेळी काही संतप्त नागरिकांकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यात आले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्रीच जामठी येथे पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिक चिघळण्यापासून रोखण्यात यश आले. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असून शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. या प्रकरणी अजिज खान पठाण याच्याविरोधात लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बोदवड पोलीस करत आहेत. दरम्यान, घटनेमुळे जामठी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.









