⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

ग. स. साेसायटी निवडणूक, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेली जळगाव ग. स. साेसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असून २१ फेब्रुवारीपर्यंत मतदार यादीवर हरकती मागवण्यात आल्या असून, ३ मार्च राेजी सुनावणी हाेणार आहे. सभासद मतदारांची अंतिम यादी ७ मार्च राेजी प्रसिद्ध हाेईल.

सुमारे ४५ हजार सभासद असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नाेकरांची साेसायटीच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्ये संपली आहे. २१ जागांसाठी हाेणाऱ्या निवडणुकीला काेराेनामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आले हाेते. त्यामुळे वर्षभरापासून संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बहुप्रतीक्षेनंतर सहकार विभागाने निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रारूप यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

एका दिवसाने पुढे ढकलली हाेती निवडणूक :

सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३१ जुलै २०२१ पर्यंत प्रशासकाचा कार्यकाळ संपलेल्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश शासनाने दिले हाेते. ग. स. साेसायटीचा प्रशासक मंडळाचा कालावधी १ अाॅगस्ट राेजी संपल्याने एका दिवसासाठी ग.स.ची निवडणुकी लांबणीवर पडली हाेती. आता दुसऱ्या टप्प्यातही समावेश न झाल्याने तिसऱ्या टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. गेली तीन महिने शांत असलेले ग.स.तील राजकीय गट कामाला लागणार आहेत. यंदा चाैरंगी व पंचरंगी लढती हाेतील, असे चित्र आतापासून दिसत आहे. सहकार, लाेकसहकार, लाेकमान्य, प्रगती, स्वराज्य पॅनल आपापले उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. एकंदर प्रत्यक्ष निवडणुकीत शंभरापेक्षा जास्त उमेदवारांमध्ये लढत शक्य आहे.

अंतिम मतदार यादीनंतर ४५ दिवसांचा कालावधी
जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तात्पुरत्या मतदार यादीवर हरकती आणि आक्षेप मागवण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी हाेऊन अंतिम मतदार यादी ७ मार्च राेजी जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हाेऊन ४५ दिवसांपर्यंत चालेल. यात अर्ज दाखल करणे, छाननी, माघार, चिन्ह वाटप, प्रचार, निवडणूक व मतमाेजणी असे टप्पे राहणार आहेत.
या तारखा लक्षात ठेवा

१० फेब्रुवारी : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध.
१० ते २१ फेब्रुवारी : मतदार यादीवर हरकती आणि आक्षेप घेता येणार आहेत.
३ मार्च : हरकती, आक्षेपांवर सुनावणी.
७ मार्च : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार.

हे देखील वाचा :