जळगाव जिल्ह्यात नऊ वर्षांत आपत्कालीन सेवेमुळे वाचले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण
जळगाव लाईव्ह न्यूज : 13 डिसेंबर 2023 : रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ४२० नागरिकांचे प्राण वाचले आहेत. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५२ हजार ३७६ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले आहे .
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘१०८’ या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.राहूल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ‘१०८’ रूग्णवाहिकेच्या रूग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली.
रूग्णांना मिळाली संजीवनी
जळगाव जिल्ह्यात 2014 पासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत अपघातग्रस्त 20 हजार 778 रूग्ण तसेच हाणामारीचे 4 हजार 476 रुग्णांना तर, 1 हजार 56 जळीत रूग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे 1 हजार 622 रुग्ण, उंचावरून पडणे 4 हजार 550 रुग्ण, विषबाधा झालेले 12 हजार 860 रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या 329 रुग्णांना, 795 मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. 1 लाख 47 हजार 56 रूग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यात आली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 334 रूग्णांना सेवा मिळाली आहे. पॉली ट्रॉमातील 5 हजार 411 रूग्णांना मदत देण्यात आली
रूग्णसेवेचा संख्येत वाढत होत आहे. 2023 या वर्षात मागील तीन महिन्यापैकी सप्टेंबर महिन्यात 2 हजार 134 रूग्ण, ऑक्टोंबर मध्ये 2 हजार 888 रूग्ण व नोव्हेंबर मध्ये 3 हजार 657 रूग्णांना आपत्कालीन सेवेचा लाभ देण्यात आला.
वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था व एनएचएम महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१०८’ रुग्णवाहिका सुरू केली असून आपातकालीन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी ‘१०८’ रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत आहे. असे डॉ. राहुल जैन यांनी सांगितले.
रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते ?
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘१०८ रुग्णवाहिका’ सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.