जळगाव जिल्हा रुग्णालय २२ जुलैपासून “नॉन कोविड” घोषित

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोनाविरहित उपचारांसाठी (नॉन कोविड) खुले करावे असा लेखी अभिप्राय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पाठवला होता. त्यावर विचार करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २२ जुलै २०२१ पासून रुग्णालय पूर्वीप्रमाणे कोरोनाविरहित उपचारासाठी सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.  तर कोरोना महामारीच्या रुग्णांना मोहाडी येथील स्त्री रुग्णालयात उपचार होतील. 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात नॉन कोविड सुविधा पूर्ववत सुरु करण्याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय तात्काळ कळवावे असे पत्र अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठवले होते. त्यानुसार शनिवारी १७ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महाविद्यालयीन परिषदेची बैठक घेण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली साधकबाधक चर्चा होऊन सर्व विभागप्रमुखानी एकमताने रुग्णालय हे कोरोनाविरहित रुग्णांसाठी खुले करण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिला.  

तसेच कोरोना आजाराच्या रुग्णांना मोहाडी येथील स्त्री रुग्णालयात उपचार व्हावेत, तेथील आयसीयू विभागात आवश्यकता भासल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचे तज्ञ डॉक्टर पाठवू, मोहाडी रुग्णालयात जागा शिल्लक नसेल तरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्याविषयी विचार व्हावा, कोरोना नसलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सी २ या कक्षातच उपचार सुरु राहतील असा लेखी अभिप्राय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या सहीनिशी जिल्हाधिकारी यांना  दिला होता. 

या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी १९ जुलै रोजी ‘नॉन कोविड’ करण्याविषयी आदेश काढले आहेत. त्यानुसार सौम्य व मध्यम कोरोनाबाधित रुग्णांवर मोहाडी येथील रुग्णालयात तर गंभीर रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात मोहाडी येथील अतिदक्षता विभाग सुरु होईपर्यंत उपचार होतील. तर कोरोना नसलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सी २ या कक्षातच उपचार सुरु राहतील. 

कोरोना महामारी मार्च २०२० मध्ये सुरु झाली. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल २०२० रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी घोषित केले. त्यानंतर पहिली लाट ओसरल्यावर १७ डिसेंबर २०२० रोजी कोरोनाविरहित (नॉन कोविड) करण्यात आले होते. दुसरी लाट आल्यानंतर २० मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांनी परत कोरोनाबाधित रुग्णांसाठी घोषित केले. तेव्हापासून कोरोनाविरहित रुग्णांना उपचार बंद आहेत. आता दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेच्या संभाव्य तयारीसाठी जिल्हाधिकारी आढावा घेत आहे. त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी असून येथे आजपर्यंत सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्ण ११ (५ अतिदक्षता विभागात), नवजात शिशु विभागात ०९ तर  म्युकरमायक्रोसिसचे ११ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाविरहित रुग्णांसाठी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे खुले व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होती. 

अशी आहे प्रवेशक्षमता

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सर्व वयोगटांसाठी अतिदक्षता विभाग, साधारण असे सर्व मिळून  ३८६ ऑक्सिजन खाटा आहेत. तसेच मोहाडी स्त्री रुग्णालयात ५०० ऑक्सिजन खाटा तर अतिदक्षता विभागात १५ खाटा आहेत.

“कोरोना सोडून इतर आजारांवर उपचार करण्यासाठी सामान्य नागरिकांची गैरसोय होत होती. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोनाविरहित सेवा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार झाले आहे. नागरिकांना २१ विविध विभागाद्वारे वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करून “नॉन कोविड” रुग्णसेवेचा लाभ घ्यावा.” 

– डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता