खडसेंना धक्का : दूध संघात १० कोटींची अनियमितता, संचालक मंडळावर कार्यवाहीच्या सूचना

ऑगस्ट 20, 2022 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । राज्यात भाजप आणि शिंदे सरकारची सत्ता आल्यानंतर गेल्याच महिन्यात दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त करत एकनाथ खडसे यांना धक्का दिला होता. मात्र आता राज्य सरकारने खडसेंना दुसरा धक्का दिला आहे. तो म्हणजे जिल्हा सहकारी दूध संघातील प्राप्त तक्रारींच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने शासनाला चौकशी अहवाल दिला आहे. त्यात संघात एकूण 9 कोटी 97 लाखांचा अतिरिक्त खर्च शासनाची परवानगी न घेताच करण्यात आल्याचा आढळून आलं आहे. त्यामुळे याप्रकरणी संचालक मंडळावर कार्यवाही करुन त्याचा अहवाल 15 दिवसात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाचे उपसचिव नि.भा. मराठे यांनी सहकारी संस्था दुग्ध विभागाच्या सहनिबंधकांना या सूचना दिल्या आहेत.

khadse jpg webp

या आदेशामुळे विद्यमान संचालक मंडळासह चेअरमन मंदा खडसे यांच्यासह आमदार एकनाथ खडसे यांनादेखील मोठा धक्का बसला आहे. राज्यात भाजप आणि शिंदे सरकारची सत्ता आल्यानंतर गेल्याच महिन्यात दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आणि याजागी प्रशासक मंडळ बसविण्यात आलं. यासोबतच नागराज पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आणि गिरीश महाजन यांच्या मागणीनुसार शासनाने दूध संघातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. या चौकशी समितीने प्राथमिक चौकशी केली असता एकूण 9 कोटी 97 लाखांचा अतिरिक्त खर्च शासनाची परवानगी न घेताच करण्यात आला असल्याचं आढळून आलं.

दूध संघात मुख्य दुग्धशाळा आणि दुग्धजन्य उपपदार्थ प्लॅन्टच्या विस्तारीकरणात आणि आधुनिकीकरणात अनियमितता होवून निधीचा गैरवापर झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना संघाने डिपीआरमध्ये समावेश असलेल्या घटकांप्रमाणे खर्च न करता अतिरिक्त घटकांचाही यात समावेश केला नाही. त्यात मंजूर असलेल्या कामांवरील खर्चात झालेल्या बचतीचा वापर अतिरिक्त घटकांवर करण्यात आला आहे. काही कारणास्तव बदल करायचे असल्यास आधी शासन मान्यता घेणे आवश्यक ठरते. मात्र, ही मान्यताही घेण्यात आली नसल्याचं शासन आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे, ही आर्थिक अनियमितता विचारात घेऊन ही रक्कम वसूल करून शासनाकडे समायोजित करावी, असंही यात म्हटलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now