⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगाव विमानतळ बंद पडणार! वाचा काय आहे स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज | 2 मार्च 2023 | जळगाव विमानतळामुळे जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाला पंख लाभतील अशी स्वप्न पाहिली जात होती. मात्र जळगावचे विमानतळ आता बंद पडणार की काय? अशा संकटात अडकले आहे. वर्षभरापासून विमानसेवा बंद असल्याने विमानतळ प्राधिकरण जळगावातून गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जळगाव विमानतळावरुन विमानसेवा सुरु करण्यासंबंधात राजकारण्यांनी केवळ घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात वर्षभरापासून येथील विमानसेवा सुरुच झाली नाही, हेच सत्य आहे.

जळगाव विमानतळावरुन विमानसेवा सुरु होण्याच्या संदर्भात जिल्ह्यातील राजकारण्यांनी नुसती ‘हवा’ केली. दिल्ली वार्‍या केल्या त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. जळगाव विमानतळावरुन मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद या शहरांमध्ये विमानसेवा सुरु होणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र प्रत्यक्षात वर्षभरापासून एकही विमान उडालं नाही. याला अपवाद म्हणजे, व्हीआयपींची चाटर्ड विमाने व प्रशिक्षणासाठीचे विमाने!

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत २६ डिसेंबर २०१७ ला जळगाव -मुंबई विमान सेवेला सुरवात झाली. तीन महिन्यात आठवड्यातून तीन वेळा विमान फेर्‍यांची सुविधा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्याच्या आतच ही विमानसेवा बंद झाली. एअर डेक्कन, ट्रु जेट या कंपन्यांची विमाने काही काळ जळगावला आली पण नंतर विमानसेवेआभावी जळगाव विमानतळ शोपीस झाले आहे. याच ‘उडान’ योजनेअंतर्गत वर्ष-२०१७ मध्ये नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग-चिपळूण (चिपी) यांसह जळगाव अशा चार विमानतळांचा समावेश करण्यात आला होता. जळगाव वगळता तिन्ही विमानतळांवरुन विमानसेवा नियमितपणे सुरु आहे.

हे देखील वाचा