⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव विमानतळाचा इतिहास व भविष्य; वाचा स्पेशल रिपोर्ट

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ डिसेंबर २०२२ | शहराची सुमारे दोन वर्षांपासून खंडित विमानसेवा फेब्रुवारी २०२३ पासून पुन्हा सुरू होणार आहे. पुणे, मुंबई, इंदूर व अहमदाबाद हे चार शहर टप्प्याटप्प्याने विमानसेवेने जोडली जाणारआहेत. स्टार एअरवेज कंपनीने यासाठी तयारी दर्शवली असल्याची माहिती महाराष्ट्र चेेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सिंधिया यांची गेल्या महिन्यात भेट घेण्यात आली होती. त्यानंतर इंडिगो व स्टार एअरवेज सोबत बैठक होऊन स्टार एअरवेजचे संजय घोडावत यांनी विमानसेवा सुरू करण्याचे मान्य केले आहे. ही सेवा फेब्रुवारी २०२३पासून सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे शहरासाठी विमानसेवा सुरू केली जाईल. त्यानंतर उर्वरित शहरांना सेवेने जोडले जाणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

उद्योगाच्या दृष्टीने जळगाव मध्य ठिकाण आहे. मात्र, रस्ते, रेल्वे व विमान सेवेअभावी जळगावातील औद्योगिक विकास त्या तुलनेत विकसित झाला नाही. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्चून जळगावात विमानतळ बांधून तयार असून, विमानसेवा सुरळीत नाही. जळगावात नाइट लँडिंगची सुविधा असलेले विमानतळ तयार झाले आहे. मात्र, सुरू असलेली विमानसेवा विस्कळित झाली आहे. यामुळे आता ही विमान सेवा पूर्ववत व सुरळीत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने जळगाव विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आज आपण जळगाव विमानतळाचा इतिहास तसेच याचे भविष्य यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

असा आहे जळगाव विमानतळाचा इतिहास

१९७१ मध्ये तत्कालीन मंत्री कै. मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते जळगाव विमानतळाचे भूमिपूजन झाले होते. १९७३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक रांनी विमानतळाचे उद्घाटन केले होते. ६१ कोटी रुपये खर्चून पहिल्या टप्प्याअंतर्गत विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. विमाने टेकऑफ व लँडिंगसाठी आवश्यक ४५ बाय १७०० मीटर धावपट्टीच व ६७ बाय ६८ मीटरच्या अ‍ॅप्रॉनचे तसेच कंट्रोलरुमचे काम पूर्ण झाले. अर्थात त्यानंतर कित्येक वर्षे विमानतळास आवश्यक सुविधांचा विकास काही झाला नाही आणि इथून उड्डाणही झाले नाही. जळगाव विमानतळावरुन खासगी विमानसेवा सुरू व्हावी या हेतूने तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विमानतळ आपल्या ताब्यात घेतले.

मात्र, पालिकेकडेही पुरेसा निधी नसल्यामुळे ते पुन्हा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला २००७ मध्ये हस्तांतरित केले. यानंतरही विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लागलाच नाही. दरम्यान प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर विमानतळाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दि. १३ जून २०१० रोजी विमानतळाचे पुन्हा एकदा भूमिपूजन झाले. त्यानंतर विमानतळाचे काम युध्द पातळीवर करण्यात आले. दि. २३ मार्च २०१२ रोजी प्रतिभाताईंच्या हस्ते जळगाव विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर तरी विमानसेवा सुरू होईल अशी अपेक्षा होती. त्यावेळी स्पाईस जेट, जेट एअरवेज, इंडिगो, सूदर्शन एअरलाईन्स या विमान कंपन्या जळगावमधून प्रवासी विमानसेवा देण्यास तयार होत्या. मात्र, जेव्हा लक्षात आले की, विमानतळाकडे नागरी उड्डाणासाठीचा परवाना व विमान तळावरील हवामान निरंत्रण कक्ष (मेट्रोलॉजी विभाग) नाही, तेव्हा या कंपन्यांनी सेवा देण्यातून अंग काढून घेतले.

रात्री मुंबईत विमाने थांबण्यास जागा नसल्याने जळगावला थांबू शकतील

नाईट लँडिंगची सोय केलेल्या या विमानतळासाठी पहिल्या टप्प्यात १७५० मीटरची धावपट्टी तर दुसर्‍या टप्प्यात ती ३५०० मीटर पर्यंत धावपट्टी वाढवण्याचे नियोजन होते. विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी विमानतळाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी ६७ कोटी रुपये मंजूर केल्याचे व धावपट्टी ३५०० मीटरपर्यंत करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार वेगाने नशिराबाद परिसरातील शेतकर्‍यांची जमीन ही त्यांचा विरोध असतानाही ताब्यात घेतली गेली. या जमिनीवर आता ३३०० मीटर पर्यंत धावपट्टी वाढवता येऊ शकते. मात्र गेल्या अनेक वर्षात याकडे कुणीच लक्ष दिले नाही. सध्याला या विमानतळावर धावपट्टी कमी लांबीची आहे म्हणून मोठी विमाने उतरू शकत नाहीत. त्यामुळे लहान विमान कंपन्या प्रवासी मिळणार की नाही या शंकेने सेवा सुरू करत नाहीत. जर धावपट्टीत वाढ करून ती ३३०० मीटर पर्यंत केली गेली तर मुंबई नागपूर, मुंबई, इंदूरच्या विमानांना १५ मिनिटांचा थांबा मिळू शकतो. तसेच रात्री मुंबईत विमाने थांबण्यास जागा नसल्याने जळगावला थांबू शकतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

अजिंठा लेणी व उद्योगांसाठी जळगाव विमानतळाचे मार्केटिंग करायला हवे

जगप्रसिध्द अजिंठा लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यात असली, तरी औरंगाबादपासून त्यांचे अंतर ११० किलोमीटर आहे, तर जळगावपासून अवघे ५० किलोमीटर. नेमक्या याच कारणामुळे काही परदेशी पर्यटक आजही जळगावमध्ये निवास करतात. अजिंठा लेण्या पाहण्यासाठी सुमारे दीड हजारांहून अधिक विदेशी पर्यटकांसह मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी येत असतात. जळगाव हे सर्वाच जवळचे विमानतळ म्हणून त्याचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतल्यास पर्यटकांच्या संख्येत भरच पडेल. याशिवाय येथून मुंबई, पुणे, नागपूरसह अन्य शहरे विमानाने जोडली गेल्यास त्याचा मोठा फायदा उद्योजकांना होईल. पर्यायाने जळगावमध्ये उद्योगधंदे वाढीस मदत होईल.