⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

शिवसेनेतील असंतोषाला निमित्त विराज कावडियाच्या निवडीचे

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहर मनपात जेमतेम संख्याबळ असलेल्या शिवसेनेने भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या बळावर सत्ता प्रस्थापित केली. शिवसेना वाढणार असे चित्र दिसत असताना जिल्हाप्रमुख निवडीवरून माशी शिंकली आणि गटबाजी समोर आली. पाहिले प्रकरण निस्तारत नही तोवर स्वीकृत नगरसेवक निवडीचे वारे वाहू लागले. 

५ चेहरे त्यात ४ जुने दिग्गज असताना नवखा युवा चेहरा विराजने बाजी मारली आणि घोळ झाला. शिवसेनेचे जुने शिवसैनिक, पदाधिकारी आणि इतर इच्छुक चेहरे आपली नाराजी जाहीर व्यक्त करू लागले असून एखादा खुलेआम बंड पुकारले यात शंका नाही.

जळगाव महानगरपालिकेत जेमतेम एक नगरसेवक स्वीकृत म्हणून सभागृहात पाठवण्याची शिवसेनेला अनुमती असताना ढीगभर नावे पुढे आली होती. पक्षाकडून एखाद्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्याला संधी मिळेल असे सर्वांना वाटत असताना चक्क नवख्या आणि तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. विविध सोशल मिडियाग्रुपमध्ये याबाबत असंतोष व्यक्त होत असून पक्षावर जिल्ह्यातील निष्ठा कमी झाल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदाच्या रांगेत निलेश पाटील, जाकीर पठाण, विराज कावडिया, दिनेश जगताप, गणेश गायकवाड यांची नावे अधिक चर्चेत होती. अमर जैन यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रत्येकाला १० महिने संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. आजवर सुरू असलेल्या चर्चेतून पक्षश्रेष्ठीकडून विराज कावडिया यांचे नाव निश्चित झाल्याचे कळताच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. 

बळीराम पेठ परिसर आजवर सेनेचा गडकिल्ला राहिला असून तेथील शाखेकडून नियमीत कार्यक्रम केले जातात. अनेक जुने आणि एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते बळीराम पेठेत असल्याने त्यापैकीच कुणाला तरी संधी देण्याची मागणी कार्यकर्ते करीत होते. माजी महानगरप्रमुख आणि सत्तांतर नाट्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे गजानन मालपुरे यांनाही संधी देण्याची मागणी झाली होती.

सर्वांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत पक्षश्रेष्ठींनी विराज कावडिया यांच्या नावाची शिफारस केल्याचे जाहीर होताच असंतोष उफाळून आला. मनपा निवडणुकीत पक्षाने तिकीट देऊन अपक्ष उमेदवारानंतर तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या आणि नुकतेच पक्षात आलेल्या विराज कावडिया या तरुणाला संधी देणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित केला गेला. शिवसेनेत पक्षांतर्गत गटबाजी दिसून येत असून विराज कावडिया यांच्या निवडीनंतर अनेक नाराज कार्यकर्ते व पदाधिकारी जाहीरपणे समोर येतील हे मात्र निश्चित आहे.