मेहरूणच्या जीवघेण्या हल्ल्यातील ‘घातक’ची प्रकृती गंभीर, दोघांवर गुन्हा

डिसेंबर 5, 2021 12:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणावर शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, जखमी पवन सोनवणे याची प्रकृती गंभीर असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Injured youth dies in Jalgaon attack

मेहरूण परिसरात राहणाऱ्या पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे या तरुणावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. तरुणावर डोक्यात, मानेवर, पोटात वार करण्यात आल्याने त्याला गंभीर अवस्थेत सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी उपचार सुरू असताना पवनची प्रकृती खालावल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पवन उर्फ घातक सोनवणेवर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हे दाखल आहेत. तसेच एकदा तो हद्दपार देखील झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शनिवारी रात्री सागर कंडारे आणि विशाल सपकाळे यांनी किरकोळ कारणावरून त्याच्यावर हल्ला केला होता. सुरुवातीला पवनच्या घराबाहेर सुरु असलेल्या वादाचा आवाज ऐकून तो घराबाहेर पडला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर दगडफेक करीत पळ काढला होता. हल्लेखोरांचा पाठलाग करीत पवन साईबाबा मंदिराच्या मागील गल्लीत पोहचला असता सागर व विशालने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते.

रात्री उशिरा याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री कलम ३०७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पवन सोनवणे याचा भाऊ प्रतीक सोनवणे याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून रुग्णालय आणि परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now